खूप पैसे आले म्हणून अक्कल येत नसते, आव्हाडांचा संजय काकडेंवर बोचरा वार

आर्थिक गुन्हेगारी विभागाच्या FIR ची प्रत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केली आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेखच नसल्याचं आव्हाडांनी सांगितलं. तर संजय काकडे यांच्या वक्तव्याचाही आव्हाडांनी ट्विटरवरुन समाचार घेतला आहे

खूप पैसे आले म्हणून अक्कल येत नसते, आव्हाडांचा संजय काकडेंवर बोचरा वार
| Updated on: Sep 29, 2019 | 12:27 PM

मुंबई : पैसे आले खूप, म्हणून अक्कल येत नसते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे राज्यसभेवरील सहयोगी खासदार संजय काकडे (Jitendra Awhad on Sanjay Kakde) यांच्यावर बोचरा वार केला आहे. अजित पवारांची पत्रकार परिषद ही केवळ नाटकबाजी असल्याची टीका काकडेंनी केली होती.

‘संजय काकडे पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते. पैसे कुणामुळे आले…. पैसे कुणी दिले… कुणी मदत केली.. विसरले कृतघ्न काकडे…’ अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी संजय काकडे यांचा समाचार घेतला.

दरम्यान, आर्थिक गुन्हेगारी विभागाच्या FIR ची प्रत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केली आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेखच नसल्याचं आव्हाडांनी सांगितलं. ते केंद्रीय मंत्री होते, इतर अनेक जणांचा उल्लेख आहे, पण त्यांचा नाही, आणि ईडी आम्ही आर्थिक गुन्हेगारी विभागाच्या FIR च्या आधारावर आमचा ECIR नोंदवल्याचं म्हणते, असं ट्वीट
आव्हाडांनी केलं आहे. शरद पवारांना बदनाम करण्यासाठी विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आव्हाडांनी केला.

संजय काकडे यांची टीका

अजित पवारांची पत्रकार परिषद ही केवळ नाटकबाजी होती. हा वाद फक्त पवारांनंतर नेतृत्व कुणाचं? याचाच आहे, अशी टीका काकडेंनी (Jitendra Awhad on Sanjay Kakde) केली होती. काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं, नौटंकी करुन सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, असं संजय काकडे म्हणाले होते. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे.

वाचा – अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, गोपीनाथ मुंडेंवरही लाठी हल्ला : संजय काकडे

शालिनीताई पाटील यांचे तीन कारखाने कचरा भावाने विकले. त्यावेळी 350 कोटींचा कारखाना कवडीमोल भावाने 35-40 कोटींना विकला. जयंत पाटलांनी औरंगाबादचा कारखान्यात कमी किमतीत घेतला, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखाने यांच्याच (राष्ट्रवादी) नेत्यांनी विकत घेतले, असा आरोपही संजय काकडे यांनी केला होता.

वाचा – काँग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला, राष्ट्रवादीनेही बारामतीच्या बाहेर लढू नये : संजय काकडे

अजित पवारांचं तांडव करून पक्षातील नेतृत्वाचं भांडण आहे. शरद पवारांनंतर कोणाचं नेतृत्व यावरून हा वाद चाललाय. शरद पवारांनी कुठे तरी हा कारखाना या माणसाला विका, किंवा मालमत्ता किंमत कमी करा, असं काहीतरी आढळून आलं असेल, त्यामुळे गुन्हा दाखल असेल. त्यामुळे अस्थिर होण्याची गरज नाही, असंही संजय काकडे म्हणाले होते.

वाचा – उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे

अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि ते गायब झाले होते. नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा दिला. या निर्णयाने पक्षातील अनेकांना दुःख झालं. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा झाला तेव्हाही असंच झालं होतं. मी जर कुणालाही सांगितलं असतं तर त्यांनी मला निर्णय घेऊ दिला नसतो. त्यांना दुखावलं म्हणून मी त्यांची माफी मागतो, असं अजित पवार म्हणाले होते.