Shiv Sena : तनवाणीवरून उद्धव ठाकरेंसमोरच तणातणी; खैरे-दानवेंमध्ये नेमकी ठिणगी कशी पडली?

| Updated on: Aug 07, 2022 | 4:59 PM

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्यासमोर मातोश्रीवरच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद झाला. किशनचंद तनवाणी यांना जिल्हाप्रमुखपद देण्यावरून हा वाद होता. या नियुक्तीवरून दानवे आणि खैरे आमनेसामने आले. दोघांची उद्धव ठाकरेंसमोरच शाब्दिक चकमक उडाली.

Shiv Sena : तनवाणीवरून उद्धव ठाकरेंसमोरच तणातणी; खैरे-दानवेंमध्ये नेमकी ठिणगी कशी पडली?
तनवाणीवरून उद्धव ठाकरेंसमोरच तणातणी; खैरे-दानवेंमध्ये नेमकी ठिणगी कशी पडली?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद : शिवसेनेतील (Shiv Sena) आमदार आणि खासदारांच्या बंडाळीनंतर आता पक्षांतर्गत वादही उफाळून येत आहेत. त्याचा पक्षांतर्गत शिस्तीवरही परिणाम होत आहे. पूर्वी मातोश्रीतून नियुक्त्या, हकालपट्ट्यांचे आदेश निघायचे आणि त्यावर कोणताही ब्र शब्द न काढता मातोश्रीचे आदेश निमूटपणे ऐकले जायचे. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता नियुक्त्यांवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच (uddhav thackeray) शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांच्यात एका नियुक्तीवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच जुंपली. त्यामुळे उद्धव ठाकरेही संतापले आणि त्यांनी या दोन्ही नेत्यांना झापलं. तुम्ही आतल्या खोलीत बसा आणि तोडगा काढून माझ्यासमोर या, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर या दानवे आणि खैरे यांनी आपल्यातील वाद मिटवल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्यासमोर मातोश्रीवरच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद झाला. किशनचंद तनवाणी यांना जिल्हाप्रमुखपद देण्यावरून हा वाद होता. या नियुक्तीवरून दानवे आणि खैरे आमनेसामने आले. दोघांची उद्धव ठाकरेंसमोरच शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे उद्धव ठाकरेही संतापले. त्यांनी या दोन्ही नेत्यांना आता तुम्हीच आतल्या खोलीत बसा. तोडगा काढा आणि मगच माझ्यासमोर या असं सुनावलं. त्यानंतर बरीच चर्चा झाली आणि तनवाणी यांना जिल्हाप्रमुख पद देण्याऐवजी महानगरप्रमुखपद देण्याचं ठरलं. तनवाणी यांना स्वतंत्र जबाबदारीसह पद देण्यावर सहमती झाली आणि वाद मिटला.

हे सुद्धा वाचा

जैस्वाल यांची शिंदे गटाकडून नियुक्ती

दरम्यान, शिवसेनेने महानगरप्रमुख पदावरून प्रदीप जैस्वाल यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर आज शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांची औरंगाबादच्या महानगरप्रमुख पदी निवड केली आहे. शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. तसं नियुक्तीपत्रंही त्यांनी काढलं आहे.

मुंडे यांची हकालपट्टी

दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेने पत्रक काढून ही हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं आहे.

शिंदे गट सक्रिय

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर शिंदे गट अधिकच सक्रिय झाला आहे. शिंदे गटाने आपण ओरिजिनल शिवसेना असल्याचं सांगत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. नव्या कार्यकारिण्याही तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.