अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे सांगायला लावू नका, लक्ष्मण ढोबळेंचा पलटवार

| Updated on: Oct 18, 2019 | 11:22 AM

अजितदादा मी माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो आहे. तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला लावू नका, अशा शब्दात लक्ष्मण ढोबळेंनी अजित पवारांना ठणकावलं.

अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे सांगायला लावू नका, लक्ष्मण ढोबळेंचा पलटवार
Follow us on

पंढरपूर : अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला लावू नका, असं म्हणत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी केलेल्या ‘नाच्या’ उल्लेखाला ढोबळेंनी (Laxman Dhoble backfires Ajit Pawar) उत्तर दिलं.

‘अजितदादा मी माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो आहे. तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला लावू नका’ अशा शब्दात ढोबळेंनी अजित पवारांना ठणकावलं. ‘अजित पवार हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यातून त्यांचे संस्कार दिसतात’ असंही लक्ष्मण ढोबळे म्हणाले.

धरणाचं पाणी खारट करतात, हे माहितच होतं. पण जनमानसात चार गोष्टी बोलून माणसं दुखावणं, हा त्यांचा जुना छंद आहे. अशा बोलण्यामुळे पक्षाचं वाटोळं झालं, शरद पवारांचं वाटोळं झालं, पक्ष उद्ध्वस्त झाला. अजूनही अजित पवारांमध्ये सुधारणा झालेली दिसत नाही, असंही ढोबळे म्हणाले.

अशा नेत्यांवर हात उगारण्यापेक्षा मतं उगारण्याची वेळ आता आलेली आहे, तेव्हाच त्यांना आपली जागा समजेल. संपत्तीचं गुरगुरणं, वाचाळपणा थांबलेला नाही. अजित पवारांना अश्रू अनावर झाले, तेव्हा पश्चाताप झाला असेल, असं मला वाटलं होतं. पण वर्तनात सुधारणा करण्याऐवजी धरणाचं पाणी खारट करणं थांबलं नाही, असा टोलाही लक्ष्मण ढोबळे यांनी (Laxman Dhoble backfires Ajit Pawar) लगावला.

मी आरेला कारे म्हणणारा, हातात बांगड्या भरल्या नाहीत : अजित पवार

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या प्रचारफेरीमध्ये लक्ष्मण ढोबळे यांनी डान्स केला होता. भाजपचा झेंडा हाती धरत ढोबळेंनी हलगीच्या तालावर नृत्य केलं होतं. याच डान्सचा उल्लेख करत मंगळवेढ्यातील सभेत अजित पवार यांनी ढोबळे यांना ‘नाच्या’ असं संबोधलं. आपलं वय काय, आपण करतोय काय, याचासुद्धा विचार नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी मंगळवेढ्यात सभा घेतली होती.

‘ढोबळे आता नाच्या झाले आहेत. हलगीचा आवाज आला की यांच्या अंगात येतं. शरद पवार यांनी ढोबळे यांना निवडून आणून मंत्री केलं. आता हा माणूस भाजपात जाऊन नाच्या झाला. आपलं वय काय, आपली अवस्था काय याचासुद्धा विचार यांना येत नाही’ अशा शब्दात अजित पवार यांनी ढोबळे यांच्यावर टीका केली होती.