सर्वात मोठी बातमी : काँग्रेसचा अंतर्गत वाद विकोपाला, बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

| Updated on: Feb 07, 2023 | 11:34 AM

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.

सर्वात मोठी बातमी : काँग्रेसचा अंतर्गत वाद विकोपाला, बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वादानं परमोच्च बिंदू गाठला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतंय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता.

यासंदर्भात हायकमांडकडे नाराजी दर्शवणारं एक पत्रही पाठवल्याची माहिती काल थोरात यांनी दिली होती. आज अखेर त्यांच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी राजकीय कारकीर्दीतला मोठा निर्णय जाहीर केला आहे.

काँग्रेसचा अंतर्गत कलह, सत्यजित तांबे, सुधीर तांबे यांच्या वादात बाळासाहेब थोरात यांनी मौनाची भूमिका घेतली होती. पक्ष श्रेष्ठींना यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे.

काय घडलं नेमकं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून अनेक काँग्रेस नेत्यांची नाराजी आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारण्यावरून थोरात-पटोले वाद अधिक उफाळून आला.

आधी सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रदेशाध्य नाना पटोले यांनी मुद्दाम आपल्याला पक्षाची उमेदवारी दिली नाही, असा गंभीर आरोप केला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसमधील राजकारणावर उघड भाष्य केलं.

तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे आपली नाराजी दर्शवणारे पत्र पाठवले असल्याचंही सांगितलं. विशेष म्हणजे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेचं समर्थन करणारी वक्तव्ये केली आहेत.

तर नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत थोरात यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. यामुळे त्यांचं काँग्रेसमधील विधीमंडळ नेते पद धोक्यात असल्याची चर्चा होती. आज अखेर त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलंय.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘
मी आज बाळासाहेबाचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा राजकीय उत्कर्ष होवो, अशी सदीच्छा देतो…

कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी होत असते. मागच्या महिन्यात नागपूरमध्ये बैठक झाली होती. पोट निवडणुकीची तसेच पदवीधर रणनीती करायची होती. आता पुढील बैठकीत या घडामोडींसदर्भात चर्चा केली जाईल. राहुल गांधींबरोबर कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालले.. त्यांचा सत्कार या बैठकीत होईल.. त्यात पक्षाच्या पातळीवर या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाईल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय.