पराभूत उमेदवाराला विधान परिषदेवर नियुक्त करता येत नाही? राजू शेट्टीच नाही तर अन्य दोघांवरही टांगती तलवार?

| Updated on: Sep 02, 2021 | 1:49 PM

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून त्याची शहानिशा केली जात असल्याचं अजित पवार म्हणाले.

पराभूत उमेदवाराला विधान परिषदेवर नियुक्त करता येत नाही? राजू शेट्टीच नाही तर अन्य दोघांवरही टांगती तलवार?
राजू शेट्टी, माजी खासदार
Follow us on

मुंबई: विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून त्याची शहानिशा केली जात असल्याचं अजित पवार म्हणाले. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं” असं अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या दोन नावांवर तर शिवसेनेनं सुचवलेल्या एका नावावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

तीन नावं नेमकी कोणती?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूचवण्यात आलेल्या नावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रा. यशपाल भिंगे यांच्या नावाचा समावेश आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदासंघातून 2019 ची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, यशपाल भिंगे यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांनी जवळपास दीड लाखांपेक्षा अधिक मतं मिळवली होती, यात त्यांचा पराभव झाला होता. तिसरं नाव आहे अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांचं त्यांनी काँग्रेसकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती त्या देखील पराभूत झाल्या होत्या. यांनंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. नजीक निवडणुकीतील पराभवाचं निकष लावायचा म्हणल्यास या तीन नावांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना आता विधानपरिषदेवर घेता येतं की नाही, याबाबतचा नियम आता महाविकास आघाडीकडून तपासला जात आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, “नाव बदललं ही चर्चा मी माध्यमात बघितली. नजिकच्या काळात पराभूत झालं तर नियुक्त केले जात नाही असे म्हणतात. पण अरुण जेटली पराभूत झाले तेव्हा त्यांना मोदी सरकारने राज्यसभेवर घेतलं. राज्यपाल नियुक्त करता येत नाही असं आम्हाला सांगण्यात आले, ते आम्ही तपासतो आहे”

सपन दासगुप्तांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा, विधानसभेत पराभव पुन्हा नियुक्ती

राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य सपन दासगुप्ता यांनी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी खासदार पदाचा राजीनामा दिला होता.भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. सपन दासगुप्ता यांनी राजीनामा देत पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत सपन दासगुप्ता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर सपन दासगुप्ता यांची पुन्हा राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हा निकष देखील विधान परिषद सदस्य नियुक्ती वेळी लावला जाणार का हे पाहावं लागणार आहे.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?
काँग्रेस

1) सचिन सावंत
2) रजनी पाटील
3) मुजफ्फर हुसैन
4) अनिरुद्ध वनकर

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी
3) यशपाल भिंगे
4) आनंद शिंदे

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी

इतर बातम्या:

12 आमदार नियुक्ती वाद, राष्ट्रवादीने यादी बदलल्याची चर्चा, राजू शेट्टींचं नाव वगळलं?

चंद्रकांत पाटील ठाकरेंना म्हणाले, खंजीर खुपसला, आता संजय राऊतांनी ‘बंद खोलीतील’ चर्चा बाहेर काढली!

Maharashtra Governor appointed members on MLC issue Defeated candidates in election not appointed on MLC claimed by some people this claim impact appointment of Raju Shetti Yashpal Bhinge and Urmila Matondkar