युतीतच लढायचंय, कोणतेही वाद न ठेवता कामाला लागा, उद्धव ठाकरेंच्या सूचना

  • Updated On - 10:16 pm, Mon, 27 May 19 Edited By:
युतीतच लढायचंय, कोणतेही वाद न ठेवता कामाला लागा, उद्धव ठाकरेंच्या सूचना

मुंबई : लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेलं यश पाहता राज्यात विधानसभा निवडणूक युतीतच लढायची आहे. त्यामुळे युतीत कोणतेही वाद नकोत, असं सांगत विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत दिले. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या जागा, तसेच पराभव झालेल्या जागांची कारणमीमांसा करण्यात आली. बैठकीत विधानसभा निवडणुका हे उद्दिष्ट समोर ठेऊन चर्चा करण्यात आली.

नेत्यांच्या बैठकीआधी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. इतर पक्षातील बड्या नेत्यांना पक्षात घेण्याबाबत मोर्चेबांधणी करण्याचंही ठरल्याचं सांगितलं जातंय. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी इतर राजकीय पक्षातून आलेल्या नेत्यांच्या पुनर्वसनाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

युती होणार असल्यामुळे यावेळी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांना बंडखोरीचा धोका आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र चूल मांडली होती. पण यावेळी पुन्हा युती करुन निवडणूक लढवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. आणखी एक म्हणजे भाजप-शिवसेनेत येण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. त्यामुळे तिकीट वाटपासाठी दोन्ही पक्षांसमोर मोठा पेच उभा राहू शकतो.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं अगोदरच जाहीर केलंय. त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर काही आमदारही येतील, असा अंदाज लावला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरही राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग होईल यात शंका नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला तिकीट वाटपात सर्वांचं मन राखण्याचं आव्हान आहे.