सरकार 2 महिन्यात जाणार, 4 महिन्यात जाणार, हे मी मंत्री झाल्यापासून ऐकतोय : मंत्री दत्ता भरणे

| Updated on: Nov 13, 2020 | 5:46 PM

राज्य सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे, यावर आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरकार 2 महिन्यात जाणार, 4 महिन्यात जाणार, हे मी मंत्री झाल्यापासून ऐकतोय : मंत्री दत्ता भरणे
Follow us on

अहमदनगर : बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच राज्य सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे, यावर आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भरणे म्हणाले की, हे सरकार दोन महिन्यात जाणार, चार महिन्यात जाणार असं मी मंत्री झाल्यापासून ऐकतोय. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार आहे. (Mahavikas Aghadi government will last for five years : Dattatray Bharne)

दत्तात्रय भरणे म्हणाले की, विकासाच्या बाबतीत एक वेगळे मॉडेल हे सरकार तयार करेल, काही लोक हे सरकार पडेल असं वक्तव्य करत आहेत, परंतु ते केवळ लोकांना चलबिचल करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे. नारायण राणेंनी केलेल्या दाव्याबद्दल विचारले असता मंत्री भरणे म्हणाले की, नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु दर 15 मिनिटाला मी त्यांचं वेगळ वक्तव्य ऐकतो. त्यामुळे राणेंबद्दल त्यांनाच विचारलं तर बरं होईल.

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. मात्र, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेने, असे नारायण राणे यांनी सांगितले, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयीदेखील चर्चा सुरु आहेत.

राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल : चंद्रकांत पाटील

आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले होते.

बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं : भरणे

मराठा आरक्षणाबाबत मंत्री भरणे म्हणाले की, प्रत्येक समाजाच्या लोकांना वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या तरुणांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत आमचं सरकार सकारात्मक आहे. मात्र ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचा निर्णय सकारात्मक येईल अशी अपेक्षा आपण करूया.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकार काही चार वर्षे चालणार नाही; पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल : चंद्रकांत पाटील

बिहारची निवडणूक झाली, आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे

(Mahavikas Aghadi government will last for five years : Dattatray Bharne)