पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाची उडी

| Updated on: Oct 29, 2020 | 5:42 PM

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाची उडी
Follow us on

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. मराठा चळवळीतील उमेदवाराला तिकीट देण्याची घोषणा साताऱ्यात करण्यात आली. कोरोनामुळं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. (Maratha Kranti Morcha to contest Pune Graduate Constituency Election)

पुणे पदवीधर मतदारसंघाची यावेळी होणारी विधानपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ‘मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र’ लढवणार आहे. यासाठी मराठा चळवळीचा उमेदवार उभा केला जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विवेकानंद बाबर यांनी दिली आहे.

उमेदवाराच्या माध्यमातून पदवीधरांना येणाऱ्या प्रश्नांना विधानभवनात वाचा फोडण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. यामधील इच्छुक उमेदवारांची निवड पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना करणार आहेत, असेही विवेकानंद बाबर यांनी सांगितले.

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही नावाविषयी तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावाची चर्चा नसल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सहकाराच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार ताकद लावली आहे. त्यातच यावेळी मदतीला शिवसेनाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत.

यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सरळ लढत होणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे यंदा पुणे पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी सेना ही महाविकासआघाडी भाजपच्या विरोधात दिसणार आहे. आता मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?

दरम्यान, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी माघार घेतली. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र त्यांनी अचानक माघार घेतल्याने इतर अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Maratha Kranti Morcha to contest Pune Graduate Constituency Election)

सारंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील कामांना पूर्ण वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती सारंग पाटील यांनी दिली होती.

भाजपमधून कोणाची वर्णी ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदार संघातून विधानसभेत गेले आहेत. त्यामुळे आता भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून कुणाची वर्णी लागते हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

पुणे पदवीधर निवडणूक, पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रबळ दावेदाराची माघार

(Maratha Kranti Morcha to contest Pune Graduate Constituency Election)