OBC Reservation | आडनावांवरून सर्वेक्षणाचा फटका, मीरा भाईंदर मनपात ओबीसी वॉर्डांची संख्या घटली

| Updated on: Aug 01, 2022 | 10:30 AM

मीरा भाइंदर महापालिकेत एकूण 35 प्रभाग असून त्यात 34 प्रभागात तीन सदस्य असतील तर एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. नवीन प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी चार जागा असून त्यात दोन पुरुष तसेच दोन महिलांचा समावेश आहे.

OBC Reservation | आडनावांवरून सर्वेक्षणाचा फटका, मीरा भाईंदर मनपात ओबीसी वॉर्डांची संख्या घटली
मीरा भाइंदर महापालिका
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः ओबीसी आरक्षण (OBC reservation) मिळवण्यासाठी फक्त मतदार यांद्यातील आडनावांवरून माहिती गोळा केल्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये (MNP Election 2022) बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीरा भाईंदर महापालिका (Mira Bhayandar Election) निवडणुकीतील आकडेवारी पाहता निवडणूक आयोगाच्या या चुकीच्या सर्वेक्षणाचे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक होणार आहे. याकरिता नवीन प्रभाग रचना जाहीर झाली असून ती आता 95 वरून 106 पर्यंत पोहोचली आहे. त्यानुसार, 26 ओबीसी नगरसेवकांची संख्या वाढून 29 पर्यंत जाणे अपेक्षित होते. मात्र प्रशासानाने इम्पेरिकल डेटा तयार करताना फक्त आडनावांवरून केलेल्या इतर मागसवर्गीयांच्या सर्वेक्षणामुळे मतदारांचा टक्का कमी झाला. त्यामुळे ओबीसी नगरसेवकांची संख्यादेखील 26 वरून थेट 20 वर घसरली आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नगरसेवकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

मतदारांची संख्या किती?

महापालिकेच्या हद्दीत सध्या 8 लाख 9 हजार 378 एवढी लोकसंख्या आहे. त्यात ओबीसींचा आकडा 1 लाख 15 हजार 363 एवढा आहे. यासह अनुसूचित जातींतील मदार 30, 243 आणि अनुसूचित जमातीची संख्या 12,596 एवढी आहे. याआधारे मीरा भाइंदर महापालिकेत नवीन प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या 95 वरून 106 एवढी झाली आहे. 11 नगरसेवकांची यंदा भर पडेल. मात्र ओबीसी सर्वेक्षणानंतर ओबीसी नगरसेवकांची संख्या 26 वरून 20 वर येणार आहे.

नव्याने सर्वेक्षणाची मागणी

मीरा भाइंदर महापालिकेच्या प्रभाग रचनेत इम्पिरिकल डेटा गोळा करताना प्रत्यक्ष मतदार संघात जाऊन सर्वे झाला नाही. त्यामुळे 2017 च्या तुलनेत ओबीसींना कमी प्रतिनिधित्व मिळेल, असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांनी केला आहे. शहरातील लोकसंख्या वाढलेली असताना नगरसेवक कमी झाल्याने ओबीसींचे नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मीरा भाईंदरमधील यंदा आरक्षण कसे?

मीरा भाइंदर महापालिकेत एकूण 35 प्रभाग असून त्यात 34 प्रभागात तीन सदस्य असतील तर एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. नवीन प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी चार जागा असून त्यात दोन पुरुष तसेच दोन महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जामातीमधून महिला व एक पुरुष निवडून जाणार आहे. तर ओबीसींसाठी 20 जागा आहेत. त्यात 10 महिला व 10 पुरुष आहेत. सर्वसाधारण प्रभागात 40 महिला तर 40 पुरुष निवडून येतील.