MLA Rohit Pawar: CM फडणवीसांवरील आरोपांवरुन भाजपचे टीकास्त्र, रोहित पवारांचा जोरदार पलटवार
अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला, ज्यानंतर भाजप नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टिका केली. अशातच आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना टिका करणाऱ्या भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

MLA Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या वादळी पत्रकार परिषदेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला, ज्यानंतर भाजप नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टिका केली. अशातच आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना टिका करणाऱ्या भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.
काय म्हणाले रोहित पवार?
“मी याठिकाणी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. इथे कोणतीही राजकीय भूमिका मी मांडणार नाही. योग्य वेळेस योग्य उत्तर मी देईन माझी बांधिलकी विचारांशी आहे, अजितदादांशी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेशी आहे. जे नेत्यांशी बांधिलकी ठेवतात जे गेले काही दिवस बोलत आहेत, त्यांना उत्तर देणे मला गरजेचे वाटत नाही,” असं आमदार रोहित पवार म्हणाले.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्या टिकेवरुनही जोरदार पलटवार केला. “कालच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सत्तेतील नेत्यांना प्रश्न केला आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचे प्रश्न विचारत आहात. मी मोठ्या नेत्यांना फॉलो करतो. सगळेच ट्वीट करतात ते मी वाचले पाहिजे किंवा फॉलो केले पाहिजे असं नाही,” असा टोला यावेळी रोहित पवार यांनी लगावला आहे.
बाळासाहेबांची प्रेरणा घेऊ, संंघर्ष करत राहू!
दरम्यान, “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनता त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत असतात, त्यांची प्रेरणा घेत असतात. आज बाळासाहेब ठाकरे यांचा 14 वा स्मृतिदिन आहे. मराठी स्वाभिमान जपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कार्य केले. त्यांनी पक्ष काढला, संघर्ष केला. त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, आधीही घेतली होती, आत्ताही घेतली आणि पुढील काळातही प्रेरणा घेऊ, आणि संघर्ष करत राहू,” असं आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.
