परवा शेट्टी, काल पवार, आज ठाकरे आणि आता गोटे, राज ठाकरेंच्या मॅरेथॉन भेटीगाठी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राज्यातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. सकाळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर, आता भाजपचे धुळ्यातील बंडखोर आमदार अनिल गोटे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली […]

परवा शेट्टी, काल पवार, आज ठाकरे आणि आता गोटे, राज ठाकरेंच्या मॅरेथॉन भेटीगाठी
| Edited By: | Updated on: May 30, 2019 | 2:49 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राज्यातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. सकाळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर, आता भाजपचे धुळ्यातील बंडखोर आमदार अनिल गोटे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलं नाही. मात्र, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात उघडपणे प्रचार केला. दुसरीकडे, अनिल गोटेही भाजपमधील बंडखोर आमदार आहेत. त्यामुळे भाजपविरोधात एकजुटीसाठी अनिल गोटेही पुढाकार घेत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

परवा शेट्टी – राज ठाकरे भेट

हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी परवा ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीदरम्यान इचलकरंजीमध्ये राज ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि राजू शेट्टींना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.

काल पवार – राज ठाकरे भेट

राज ठाकरे यांनी काल मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यात जाऊन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीतील विरोधकांच्या मोठ्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्याचीच चर्चा पवार-ठाकरे भेटीनंतर सुरु झाली.

आज ठाकरे – ठाकरे भेट

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज ‘कृष्णकुंज’ या बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला आघाडीत समाविष्ट करण्यासाठी एकीकडे हालचाली सुरु आहेत. मात्र, मनसेला आघाडीत घेण्यास प्रामुख्याने काँग्रेसचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, शरद पवार, राजू शेट्टी, माणिकराव ठाकरे आणि अनिल गोटे या चार महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही, अद्याप राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला आहे का, की आणखी काही मोर्चेबांधणी होऊन विधानसभेसाठी राज्यात नवीन समीकरणं उदयास आणली जातील, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळ चर्चिला जात आहे.