Amit Thackeray | शिंदेगटाकडून मनसे नेते अमित ठाकरेंचं स्वागत? कर्जतमध्ये बैठक, आमदार महेंद्र थोरवेंसोबत 20 मिनिट चर्चा…

| Updated on: Jul 11, 2022 | 1:50 PM

शिवसेनेतूनच बाहेर निघालेल्या राज ठाकरे यांच्या मनसे पक्षानंही अत्यंत खबरदारीनं पावलं उचलायला सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे. तळा-गाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचं मिशन मनसेनं हाती घेतलंय. या

Amit Thackeray | शिंदेगटाकडून मनसे नेते अमित ठाकरेंचं स्वागत? कर्जतमध्ये बैठक, आमदार महेंद्र थोरवेंसोबत 20 मिनिट चर्चा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिवसेनेच्या गोटातून आमदारांनंतर खासदारांचीही गळती होत असल्याच्या बातम्या येत असतानाचा शिंदे (Eknath Shinde Group) गटाची ताकदही वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या प्रत्येक हालचालींवर जनतेचं लक्ष आहे. या राजकीय स्थितीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख असून त्यांनी महेंद्र थोरवे यांची घेतलेली भेट ही मुंबई आणि परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडल्यानंतर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, शिंदे गटाला कोणत्या तरी पक्षाल विलीन व्हावं लागेल, असं म्हटलं जात होतं. यात भाजप किंवा मनसे पक्षाचीही चर्चा होती. मात्र शिंदे गटाने आपणच शिवसेना आहोत, शिवसेना सोडून आम्ही कुठेही जाणार नाहीत, असं म्हटल्याने ही शक्यता पूर्णपणे नाकारण्यात येऊ लागली.

अमित ठाकरेंशी 20 मिनिटे चर्चा

कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज मनविसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानानिमित्त अमित शाटकरे कर्ज दौऱ्यावर आहेत. यावेळी महेंद्र थोरवे यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर या दोन नेत्यांमध्ये संवाद झाला. मात्र चर्चेत नेमके कोणते मुद्दे होते, याविषयीचा तपशसील अद्याप कळू शकलेला नाही.

अमित ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर कधी?

मनविसे नेते अमित ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतील. 16 जुलैपासून अमित ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ते सुरुवातीला उस्मानाबादेत जातील. तुळजापूरात भवानीमातेचं दर्शन घेतील. त्यानंतर ते नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये येतील. 25 जुलै रोजी ते मुंबईकडे मार्गस्थ होतील. अमित ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान, मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रकाश महाजन, अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी आदी उपस्थित राहतील.

शिवसेनेतून धडा, मनसे अॅक्टिव्ह?

पक्षसंघटन आणि पक्षातील एकजूटीत शिवसेना अपयशी ठरल्याने महाराष्ट्रात मोठं सत्तांतर घडून आलं. हे नाट्य अवघ्या महाराष्ट्राने नुकतंच अनुवभवलं. विधानसभेत प्रबळ स्थितीत असलेल्या शिवसेनेची अशी स्थिती झाल्याने प्रत्येक पक्षाने यापासून धडा घेतलेला दिसतोय. शिवसेनेतूनच बाहेर निघालेल्या राज ठाकरे यांच्या मनसे पक्षानंही अत्यंत खबरदारीनं पावलं उचलायला सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे. तळा-गाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचं मिशन मनसेनं हाती घेतलंय. यासाठीच मनविसे नेते अमित ठाकरे यांनी आधी मुंबईतील कॉलेजांमध्ये मेळावे घेतले. त्यानंतर आता ते कोकण आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुपौर्णिमेला राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शनदेखील करणार आहेत.