विदर्भातील मंत्र्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्या, बाळू धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?

| Updated on: Jan 19, 2021 | 9:02 AM

विदर्भात पक्षाला मोठा स्कोप आहे. त्यामुळे काँग्रेसने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा' अशी आग्रही मागणी बाळू धानोरकर यांनी केली. (Balu Dhanorkar Congress State President)

विदर्भातील मंत्र्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्या, बाळू धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?
Follow us on

नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Congress MP Balu Dhanorkar) यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसत आहेत. ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं’ अशी मागणी धानोरकरांनी केली आहे. बाळू धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत विदर्भासाठी दावेदारी केली. (MP Balu Dhanorkar fields for Vidarbha Leader as Congress State President)

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात विदर्भाला मिळालेल्या यशानंतर धानोरकरांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावेदारी केली आहे. ‘काँग्रेसला आक्रमक आणि सर्वांना घेऊन चालणारा अध्यक्ष हवा. विदर्भात पक्षाला मोठा स्कोप आहे. त्यामुळे काँग्रेसने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा’ अशी आग्रही मागणी बाळू धानोरकर यांनी केली.

धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?

बाळू धानोरकर यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेत आपला मानस बोलून दाखवला. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीकडे मंत्रीपद असावं, अशीही त्यांची मागणी आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्यासाठी फील्डिंग करताना दिसत आहेत. याआधी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष ओबीसी समाजातून झाल्यास आनंदच होईल, असंही धानोरकर म्हणाले होते. त्यामुळे धानोरकरांचा रोख वडेट्टीवारांकडे असल्याचं स्पष्ट होतं.

वडेट्टीवार इच्छुक

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली होती. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे. वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यास इच्छुक असल्याचं समजतं. परंतु इतर दिग्गजही शर्यतीत असल्याने नव्या वारसदाराच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

नाना पटोलेही शर्यतीत

दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. पटोलेही विदर्भातील नेते आहेत, परंतु ‘मंत्रिपद असलेला प्रदेशाध्यक्ष’ असं धानोरकरांनी म्हटल्यामुळे त्यांच्या मनात नेमके कोण आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. (MP Balu Dhanorkar fields for Vidarbha Leader as Congress State President)

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.

धानोरकरांचा मोदींविरोधात शड्डू

खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य बाळू धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

संबंधित बातम्या :

शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!

काँग्रेसच्या एकमेव खासदाराने करुन दाखवलं, यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची समर्थकाला

(MP Balu Dhanorkar fields for Vidarbha Leader as Congress State President)