प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्यास नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

प्रदेशाध्यक्षपदाची संधी एकाच नेत्याला मिळाल्यानंतर इतर नेते नाराज होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसकडून आता ‘मुंबई मॉडेल’चा वापर करून या नेत्यांची समजूत काढली जाऊ शकते. | Congress Maharashtra new president

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:32 AM, 12 Jan 2021

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या (Congress new president) निवडीवरुन पक्षात बराच खल सुरु आहे. मकरसंक्रांतीनंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्रातील नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील अनेक बडे नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाची संधी एकाच नेत्याला मिळाल्यानंतर इतर नेते नाराज होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसकडून आता ‘मुंबई मॉडेल’चा वापर करून या नेत्यांची समजूत काढली जाऊ शकते. (Congress will implement new strategy to to keep calm disappointed leaders)

या फॉर्म्युलानुसार प्रदेशाध्यक्ष न होऊ शकलेल्या नेत्यांकडे इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तसेच प्रदेशाध्यक्षासह चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भाई जगताप यांनी नियुक्ती करण्यात आली होती. तर चरणसिंह सप्रा, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अमरजीत सिंह मनहास आणि सुरेश शेट्टी या नेत्यांना पाच वेगवेगळ्या समित्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर आता प्रदेश काँग्रेस?

काँग्रेसने भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली असली तरी त्यांच्या अधिकारांना कात्रीही लावली आहे. मुंबई काँग्रेसच्या निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचे चेअरमनपद काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांकडे दिलं आहे. मुंबई काँग्रेसमध्ये होणाऱ्या तिकीट वाटपाचा घोळ लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर प्रदेशाध्यक्षांनाच बसवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची दात नखेच काढून घेतल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयामुळे मुंबई काँग्रेसची स्वायत्ताच गेली असून हे पद निव्वळ शोभेची बाहुली बनल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

सातव यांची खेळी?

मुंबई काँग्रेसच्या स्क्रीनिंग आणि स्ट्रॅटेजी कमिटीच्या चेअरमनपदाची सूत्रे प्रदेशाध्यक्षांच्या हाती देण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव सातव यांची खेळी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हायकमांडही त्याला अनुकूल आहेत. त्यामुळे सातव आगामी काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून येऊ शकतात. अशावेळी मुंबई काँग्रेसचं नियंत्रणही आपल्या हातीच राहावं म्हणून त्यांनी ही नवी तरतूद घडवून आणणल्याचं सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

काँग्रेसच्या गोटात रात्रीची खलबतं; लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाच्या घोषणेची शक्यता

शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी

(Congress will implement new strategy to to keep calm disappointed leaders)