काँग्रेसच्या एकमेव खासदाराने करुन दाखवलं, यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची समर्थकाला

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद खासदार बाळू धानोरकर गटाच्या टिकाराम कोगरे यांच्याकडे असेल. Yawatmal Bank Balu Dhanorkar

काँग्रेसच्या एकमेव खासदाराने करुन दाखवलं, यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची समर्थकाला
अनिश बेंद्रे

|

Jan 04, 2021 | 3:25 PM

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा असून अध्यक्षपदी काँग्रेसचे टिकाराम कोगरे विराजमान झाले आहेत. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत समर्थकाला अध्यक्षपदाची खुर्ची दिली. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे वसंतराव घुईखेडकर, तर दुसरे उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे संजय देरकर यांची निवड करण्यात आली आहे. बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी आघाडीला 15, भाजपप्रणित शेतकरी सहकार विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या, तर तीन जागांवर अपक्ष विजयी झाले. (Yawatmal District Co Operative Bank Chairman Balu Dhanorkar supporter)

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदासाठी दोन आणि तीन वर्ष असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. पुढील दोन वर्षांसाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद खासदार बाळू धानोरकर गटाच्या टिकाराम कोगरे यांच्याकडे असेल.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे काही मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा. या मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले.

बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र अखेर बाळू धानोरकर यांचा विजय झाला.

खा. बाळू धानोरकर यांनी आपल्या गटाकडे अध्यक्षपद राहावं, म्हणून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावत अध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतले आणि निवडणूक बिनविरोध करून घेतली

अध्यक्षपदासाठी दोन-तीनचा फॉर्म्युला

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नंतरच्या तीन वर्षांची धुरा मनीष पाटील यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे. आर्णी ओबीसी राखीव गटातून तब्बल दहा वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिलेले मनीष पाटील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. संचालक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत हे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. या बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती.

फॉर्म्युला ठरला नाही

बाळू धानोरकर हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. अध्यक्ष पदाबाबत फॉर्म्युला ठरला का, याबाबत विचारणा केली असता असं काहीच ठरलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचा दुसरा गट दुखावला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या काळात बँकेत आणि जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसचे दोन गट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आधी उपाध्यक्षपद नंतर प्रवेश

काँग्रेस राष्ट्रवादीच्या पठडीत तयार झालेल्या वणी येथील संजय देरकर हे राष्ट्रवादीचे नेते होते. विधान परिषद निवडणुकीपासून देरकर यांनी सेनेशी घरोबा केला होता. त्यात मारेगाव गटातून सेनेच्या कोट्यातून संजय देरकर जिल्हा बँकेवर निवडून आले. मात्र त्यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाला नव्हता. त्यांना जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाबाबत जिल्ह्यातील सेना नेत्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आली.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदासाठी तेरा वर्षानंतर निवडणूक झाली. डिसेंबर अखेरीस ही मतदान प्रक्रिया पार पडली होती. तालुका गटातील पुसदमधुन अनुकूल चव्हाण तर उमरखेड मधून प्रकाश पाटील देवसरकर आधीच बिनविरोध विजयी झाले. त्यानंतर 19 जागांसाठी मतदान झाले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 15 जागा जिंकत महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर तीन जागा अपक्षांनी खिशात घातल्या.

संबंधित बातम्या :

शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!

(Yawatmal District Co Operative Bank Chairman Balu Dhanorkar supporter)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें