Sanjay Raut : काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू, लोक स्वर्गात गेले, तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं – संजय राऊत

Sanjay Raut : "सर्वपक्षीय बैठकीची गरज नाही, ते वन मॅन शो आहेत. सर्वपक्षीय बैठक घेऊन काय करणार? गृहमंत्री राजीनामा देणार असतील, तर त्या बैठकीला अर्थ आहे. हे राज्यकर्ते नाहीत, अंडरवर्ल्ड टोळ्या चालवणारे लोक आहेत" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू, लोक स्वर्गात गेले, तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं - संजय राऊत
Sanjay Raut-Narendra Modi
| Updated on: Apr 23, 2025 | 12:15 PM

काश्मीरच्या पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली, अशी माहिती आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अहो, मुस्लिम सुद्धा मारले गेलेत. हे नवीन गोष्टी सोडतील. धर्म विचारला असेल, तर त्याला भाजपच द्वेषाच राजकारण जबाबदार आहे. देशात द्वेषाच राजकारण सुरु आहे, ते बूमरॅग होऊ शकतं. जे झालं, त्याला भाजपच घाणेरडं, द्वेषाच राजकारण जबाबदार आहे. आमचे 27 ते 30 भाऊ मारले गेले, याला अमित शाह जबाबदार नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. मंगलप्रभात लोढ या हल्ल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अमित शाहचा निषेध करा, मोदींचा निषेध करा. ही नौटंकीबंद करा. मंगलप्रभात लोढा यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही लोकांचा आक्रोश बघा, तुमच्या नौटंकीमुळे लोकांचा जीव गेलाय. मोदींना सुरक्षा आहे, फडणवीस, अमित शाह यांच्या मुलाला, कुटुंबाला सुरक्षा आहे. आमच्यासारख्या सामान्यांना सुरक्षा कुठे आहे?” असं संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अजून काय करणार हे लोक? करारा जबाब देणार म्हणतात, म्हणजे इथे येऊन दोन-चार मशिदी तोडतील. हिंदू-मुस्लिम करतील, अजून काय करणार हे लोक?” “काय करु शकतात? खोटा सर्जिकल स्ट्राइक करतील. बिहारची निवडणूक येत आहे. याला सरकार, गृहमंत्री जबाबदार आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

‘एकनाथ शिंदे दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा’

“अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, हे फेल गृहमंत्री आहेत. मोठमोठ्या गोष्टी बोलतात. गँग चालवतात तसा देश चालत नाही. देश चालवण्यासाठी संयमाने काम करावं लागतं” असं संजय राऊत म्हणाले. “एकनाथ शिंदे म्हणतात जशास तसं उत्तर दिलं जाईल. हे हास्यास्पद आहे. एकनाथ शिंदे काय करणार? त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर जाणार का?. एकनाथ शिंदे दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. अमित शाह त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. या देशाच्या इतिहासातले अपयशी गृहमंत्री आहेत. गुंडागर्दी करुन देश चालत नाही. धार्मिक द्वेषाच्या राजकारणाचा हा परिणाम आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘गोमूत्र शिंपडून जिवंत करणार का?’

“मोदी म्हणालेले दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीर बनवू. जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू, लोक स्वर्गात गेले. तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं. उद्या हे लोक 27 जणांच्या घरी जाऊन सांगतिल की, नंदनवनात त्यांचा मृत्यू झाला ते स्वर्गात गेले, जसं कुंभमेळ्याच्यावेळी सांगितलेलं, जे मेले त्यांना मोक्ष मिळाला. मेलेले लोक गोमूत्र पाजून जिवंत होणार नाहीत. फडणवीस म्हणतात करारा जबाब देंगे, गोमूत्र शिंपडून जिवंत करणार का?” अशी टीका संजय राऊत यांनी केली.