‘भाजपावर टीका करून सत्य लपत नसते’, ड्रग्स प्रकरणात केशव उपाध्येंचा मलिकांना टोला

| Updated on: Oct 09, 2021 | 6:37 PM

नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

भाजपावर टीका करून सत्य लपत नसते, ड्रग्स प्रकरणात केशव उपाध्येंचा मलिकांना टोला
केशव उपाध्ये, नवाब मलिक
Follow us on

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीसह भाजपवर जोरदार टीका केलीय. मलिकांच्या या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केलाय. नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला. (Keshav Upadhyay criticizes Nawab Malik in Mumbai drugs case)

अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल, अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच, असंही उपाध्ये म्हणाले.

‘वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे’

उपाध्ये म्हणाले की, नवाब मलिक यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की अटक केलेल्या आरोपींना एनसीबी कोठडीत ठेवायचे का, न्यायालयीन कोठडीत म्हणजे तुरुंगात पाठवायचे का किंवा जामीन द्यायचा याचा निवाडा न्यायालय करत आहे. त्या निमित्ताने तपासकामाची पडताळणी न्यायालयात होत आहे. नवाब मलिक यांना वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे आणि आपले म्हणणे मांडावे. पण ते प्रत्यक्ष न्यायालयात न जाता केवळ मीडिया ट्रायलमधून तपासकामाबद्दल संशय निर्माण करत आहेत. ते विनाकारण भाजपला यामध्ये ओढत आहेत. असे करून त्यांच्या मनाचे समाधान होईल पण आरोपींची सुटका होणार नाही.

नवाब मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप

नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. पत्रकार परिषद घेत मलिकांनी आज पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केलाय. क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. 12 तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. मात्र, अवघ्या तीन तासात वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना सोडून देण्यात आलं. यावेळी वृषभ सचदेवाचे वडील होते. अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केलीय.

इतर बातम्या :

काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट

‘देवेंद्रजींना बोलावल नाही, राज्यपालांना विमानातून उतरवल तितच यांचा कोतेपणा दिसतो’, भातखळकरांचा टोला

Keshav Upadhyay criticizes Nawab Malik in Mumbai drugs case