
मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगाव महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं आहे. या पुतळ्याचं भूमिपूजनही उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते पार पडलं होतं. मात्र आता उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून जळगाव महापालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे. यात राज शिष्टाचाराचे नियम देण्यात आले आहेत. पुतळा अनावरन करण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच अधिकार असल्याचं या पत्रात म्हणण्यात आलं आहे. याला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आता उत्तर दिलं आहे.
सरकारने जे परिपत्रक काढलं आहे ते त्यांच्याकडेच ठेवावं. मुळात हे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. जळगाव महानगरपालिकेचा हा कार्यक्रम आहे. महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था आहे आणि त्या पुतळ्याच्या जागेचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं .तेव्हा का नाही त्यांना बुद्धी सुचली. आम्ही भूमिपूजन करणारच आहोत. हा पुतळा आम्ही बसवणार तेव्हा का नाही आलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं पुतळ्याच्या उद्घाटना मी येणार आहे. यात काय चुकीचं आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या महापौरांनी उद्धव ठाकरे यांना हे आमंत्रण दिलं आहे. मग वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असेल मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आता हे जे काड्या घालण्याचे काम करत आहे. ते थांबवा नाहीतर जनता तुम्हाला बांबू घालेल. आज तुम्ही कुठे राजकारण करत आहेत हे तुमचे धंदे बंद करा. थोडे दिवस राहिले आहेत. ते तुम्ही सुखाने जगा. मग तुम्हाला पेन्शनवर जायचं आहे. आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ, असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा आज अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आणि आम्ही त्या ठिकाणी जाणारच आहोत. जर सरकारला जळगाव कायदा सुव्यवस्था परिस्थिती गंभीर करायची असेल काठी घालायची असेल तर त्यांनी तसं करावं. त्यांनी महानगरपालिकेच्या संदर्भात काय नियम-कायदे असतात, ते शिकून घ्यावेत. मग अशी पत्रकं काढावीत. आम्ही चाललो आहेत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक तेथे जमणार आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी आपला निर्धार बोलून दाखवला.