
मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्याबाबत शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतरही त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवली. गेल्या दोन वर्षात जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनामय केलाय, त्यामुळे आता माघार शक्य नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत जालना मतदारसंघ भाजपकडे आहेत. जालन्याचे विद्यमान खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवार असतील. पण दानवेंविरोधात लढण्याची भूमिका खोतकरांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. युती झाल्यानंतर खोतकरांची अडचण झाली. पण त्यांनी ही जागा न मिळाल्यास बंडखोरीचे संकेतही दिले आहेत.
उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाल्याचं खोतकरांनी सांगितलं. भेटीबाबत ते म्हणाले, “काही तक्रारी केल्या, माझ्यावरती काय अन्याय झाला, प्रसंग झाला याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगितलं. मी पुढे गेलोय. मतदारसंघ हा शिवसेनेकडे आला पाहिजे ही मागणी केली आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर भेटतील. पक्षावर कोणतीही नाराजी नाही. मी बाजारात चांगला माल आहे. उद्धव ठाकरे उद्या सांगतील ते मी मान्य करेन. मुख्यमंत्र्यांबाबत आदर आहे, त्यांनी कायम साथ दिली. माझी भूमिका उद्धव ठाकरेच ठरवतील, असं खोतकर म्हणाले.
खोतकरांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसही पुढे सरसावली होती. पण आपण ठाकरे घरण्याला कधीही धोका देणार नसल्याचं खोतकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल हे मान्य केलं असलं तरी दानवेंविरोधात लढण्याची त्यांची भूमिका कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर काय निर्णय होतो त्याकडे लक्ष लागलंय.