Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या रडण्याने भाजप अडचणीत? गेम फिरला, नेमकं काय घडलं?

Nagpur MLC Election Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आधी भाजपच्या सर्वेक्षणात नितेश कराळेंबाबतचा 'तो' अंदाज वर्तवला होता त्यापेक्षा त्यांना जास्त मतदान झाल्याचे चित्र आहे.

Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या रडण्याने भाजप अडचणीत? गेम फिरला, नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 8:43 AM

राज्यात विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कालपासून सुरु असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राउंड असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तर केंद्रस्थानी आहे. मतमोजणीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीअखेर मात्र चित्र पूर्णपणे बदलले आणि भाजपचे सुधाकर कोहळे ४,२९१ मतांनी पुढे गेले. मात्र, कोणत्याही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण न केल्यामुळे आता दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरील नितेश कराळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली असतानाही आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रचारात उडी घेतली असतानाही अपेक्षित सहज विजय अद्याप कोणालाही मिळालेला नाही. बुधवारी सकाळी उपलब्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार दोन्ही फेऱ्यांनंतर एकूण १ लाख ५० हजार ८७४ वैध मतं नोंदली गेली आहेत. यामुळे नियमांनुसार विजयासाठी ७५ हजार ४३८ मतांचा कोटा ठरला आहे. मात्र कोणत्याही उमेदवाराने हा कोटा गाठलेला नसल्याने आता बाद फेरी सुरू झाली असून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे.

Loading...

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना २४,२४९ मते मिळाली असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. आता त्यांच्या मतांपैकी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची किती मते मिळतात, हेच या निवडणुकीतील निर्णायक घटक ठरण्याची शक्यता आहे. मतदानाच्या काही तास आधी शरद पवार गटाने नितेश कराळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. या निर्णयामुळे ते प्रचंड दुखावले गेले होते आणि त्यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. या इमोशनल अपीलचा मतदानाच्या दिवशी त्यांना फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे.

नागपूरमध्ये एकूण 71 टक्के मतदान झाले

या निवडणुकीत नागपूर शहर परिसरात सुमारे ६० टक्के तर चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली भागात ७१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. भाजपने एकदिलाने प्रचार केला होता. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार केला. त्यामुळे मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुधाकर कोहळे यांना पहिल्याच फेरीत विजय मिळेल, असा विश्वास होता. मात्र रात्रीपर्यंत चित्र पालटत गेले आणि आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची वाट पाहावी लागत आहे.

काय सांगते भाजपचे सर्वेक्षण

भाजपच्या प्राथमिक सर्वेक्षणात नितेश कराळे यांना पहिल्या पसंतीची सुमारे १५ हजार मते मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यांनी तब्बल २५ हजार मते मिळवून सर्वेक्षणापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी कोणाला अधिक पाठबळ आहे, याबाबत कोणत्याही पक्षाला नेमका अंदाज नाही. आज दुपारपर्यंत संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे.

१५ हजार १०६ मतदान अवैध

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अवैध मतांची नोंद झाली आहे. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर केवळ २ आकडा लिहिल्याने मतदान अवैध ठरले. एकूण १ लाख ६५ हजार ५४१ मतदानापैकी तब्बल १५ हजार १०६ मतदान अवैध ठरले आहे. पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान अवैध झाल्याने पदविधरांच्या मतदान प्रक्रियेवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us