राष्ट्रवादी बुधवारी गणेश नाईकांसोबतच नवी मुंबई महापालिकाही गमावणार

| Updated on: Sep 09, 2019 | 9:49 PM

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासह महापालिकाही राष्ट्रवादीच्या (Navi Mumbai Ganesh Naik) हातून जाणार आहे. नगरसेवकांनी सोमवारीच गट स्थापन करण्याच्या हालचाली केल्या. मात्र तांत्रिक त्रुटींमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

राष्ट्रवादी बुधवारी गणेश नाईकांसोबतच नवी मुंबई महापालिकाही गमावणार
Follow us on

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे जिल्ह्यात बुधवारी सर्वात मोठा धक्का बसणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक (Navi Mumbai Ganesh Naik) बुधवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. त्याच दिवशी राष्ट्रवादी सोडलेले 55 नगरसेवक गट स्थापन करणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासह महापालिकाही राष्ट्रवादीच्या (Navi Mumbai Ganesh Naik) हातून जाणार आहे. नगरसेवकांनी सोमवारीच गट स्थापन करण्याच्या हालचाली केल्या. मात्र तांत्रिक त्रुटींमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

सोमवारी नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 52 पैकी 50 नगरसेवकांनी गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या नगरसेवकांसोबत 5 अपक्ष नगरसेवकही पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत. सकाळपासून जय्यत तयारी करण्यात आली आणि महापौर बंगल्यावरील बैठकीनंतर 55 जणांचं प्रतिज्ञापत्र घेऊन जाण्याचा निर्णय झाला.

बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नवी मुंबई अध्यक्ष अनंत सुतार, मनपाचे सभागृह नेते रविंद्र इथापे, गणेश नाईक परिवारचे सागर नाईक आणि राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील जवळपास सर्व मोठे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कोकण विभागीय आयुक्तालयात जाण्यासाठी लक्झरी बसही तैनात होती.

अखेर सर्वांसाठी स्वतंत्र एक पानी प्रतिज्ञापत्र काम पूर्ण करुन दुपारच्या वेळेत सर्व 55 नगरसेवक कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. पण या एक पानी प्रतिज्ञापत्रात आयुक्तांनी त्रुटी दाखवल्या आणि ते अपात्र घोषित केलं. पुन्हा प्रतिज्ञापत्र बनवून आणेपर्यंत कार्यालयीन वेळ संपली होती आणि मंगळवारी शासकीय सुट्टी आहे.

या सुट्टीमुळे आता बुधवारीच या नगरसेवकांचा गट स्थापन होऊन भाजपात अधिकृत नगरसेवक म्हणून प्रवेश होईल. यासोबतच भाजपचा सत्तास्थापनेचा मार्गही मोकळा होईल. विशेष म्हणजे बुधवारीच गणेश नाईकही भाजपात प्रवेश करत आहेत. गणेश नाईक यांचा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होईल. गणेश नाईकांसह अनेक पदाधिकारीही भाजपात प्रवेश करणार आहेत.