‘फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, पण आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार’, फडणवीसांच्या आरोपानंतर मलिकांचा थेट इशारा

मलिक यांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून कवडीमोल दराने जवळपास 3 एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपांना आता मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, पण आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार, फडणवीसांच्या आरोपानंतर मलिकांचा थेट इशारा
देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 2:58 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जमीन खरेदी गैरव्यवहाराचा एक गंभीर आरोप केलाय. मलिक यांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून कवडीमोल दराने जवळपास 3 एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपांना आता मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, पण आम्ही उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार असा दावाच मलिक यांनी केलाय. (Nawab Malik’s explanation on Devendra Fadnavis’ allegations)

फडणवीसांचे फटाके भिजले त्यामुळे आवाज आला नसेल. तुमच्यापूर्वी गोपीनाथ मुंडे होते. त्यांनीही काही मंत्र्यांचे संबंध दाऊदशी जोडले होते. पण माझ्या 62 वर्षाच्या जीवनात कुणीही अशा प्रकारचा आरोप लावू शकलं नव्हतं. आज त्यांनी एका जागेवरुन आरोप केलाय. मला वाटतं तुमचे जे माहितीगार आहेत. ते कच्चे खिलाडी आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर अजून काही कागदपक्ष तुम्हाला दिली असती. आज मी बोलणार नाही. पण उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डला हाताशी धरुन संपूर्ण शहराला कसं वेठीस धरलं हे उघड करणार, असा इशाराच मलिक यांनी केलाय.

‘फडणवीसांविरोधात उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार’

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार. फडणवीसांचे लोक कोणत्या अधिकाऱ्याकडून जमिनी हडप करण्याचं काम करत होते. कशाप्रकारे एक अंडरवर्ल्डचा म्होरक्या विदेशात बसून या शहरातून वसुली करत होता? तो म्होरक्या कुणासाठी काम करत होता? तो अधिकारी कुणाचा खास होता? याची उत्तरं जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजेची वाट पाहा, असं मलिक म्हणाले.

फडणवीसांच्या आरोपांवर मलिकांचं स्पष्टीकरण

दरम्यान, गोवावाला कंपाऊंडमध्ये आम्ही किरायाने राहायला होतो. तेव्हा जागा मालकिनीने आम्हाला जमीन विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शाह वली खानचे वडील तिथे वॉचमन म्हणून काम पाहत होते. तिथे शाह वली खानचं एक घरही होतं. त्याने तिथे 300 मीटर जागेवर कब्जा केला होता. आम्हाला रजिस्ट्रीला गेल्यावर ही गोष्ट माहिती पडली. ती जागा घेण्यासाठी आम्ही शाह वली खानला पैसे दिले. कुठल्याही अंडरवर्ल्डच्या माणसाकडून आम्ही जमीन खरेदी केली नाही, असं स्पष्टीकरण मलिक यांनी दिलं आहे. दरम्यान, फडणवीस माहितीगार कच्चे खिलाडी आहेत. त्यांनी आमच्याकडून माहिती घ्यायला हवी होती. मी त्यांना कागद दिले असते, असा खोचक टोलाही मलिक यांनी लगावलाय.

संबंधित बातम्या :

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Nawab Malik’s explanation on Devendra Fadnavis’ allegations