MLC Polls | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर

| Updated on: May 10, 2020 | 1:58 PM

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले (NCP candidates for MLC poll) आहे.

MLC Polls | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर
Follow us on

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले (NCP candidates for MLC poll) आहे. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर झालं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

विधानपरिषदेसाठी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे नावं अनेक दिवसांपासून चर्चेत होते. शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाते. तर अमोल मिटकरी यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान त्यांची भाषणं प्रचंड गाजली होती. पक्षात त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुकही केलं आहे. अखेर त्यांना पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाली आहे.

काँग्रेसची आग्रही भूमिका

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेत पुढचं पाऊल टाकलं. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवारही जाहीर केला. विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर केली.

काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात असताना, काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्यानुसार आता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसही 2 जागा लढणार आहेत.

दुसरीकडे भाजपने संख्याबळानुसार 4 जागांवर दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीने सहावा उमेदवार दिल्याने, भाजपही आणखी एक उमेदवार देऊ शकतो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

विधानपरिषदेत भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3 , काँग्रेस 2 आणि शिवसेनेचे 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. आता संख्याबळानुसार यंदा निवडणुकीत निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेची निवडणूक कधी?

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली. (NCP candidates for MLC poll)

संबंधित बातम्या :

MLC Polls | असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र

राष्ट्रवादीची तोफ विधानपरिषदेत धडाडण्याची शक्यता, अमोल मिटकरींना उमेदवारीचे संकेत