पुणे पदवीधर निवडणूक, पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

| Updated on: Jul 28, 2020 | 11:20 AM

पार्थ पवार पदवीधर मतदारसंघातून नशीब आजमवणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या, मात्र हे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले आहे.

पुणे पदवीधर निवडणूक, पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
Follow us on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतल्याने पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा रंगली होती. (NCP clarifies on Rumors of Parth Pawar contesting Pune Graduate Constituency Election)

लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतर पार्थ पवार गेल्या काही महिन्यात राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी कालच केली होती.

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. पार्थ पवार पदवीधर मतदारसंघातून नशीब आजमवणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या, मात्र हे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले आहे.

हेही वाचा : देशभावना समजून घ्या, पार्थ पवारांची थेट गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मोठी मागणी

कोण आहेत पार्थ पवार?

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

सारंग पाटील यांची माघार

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतली आहे. सारंग पाटील हे राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र.

साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करुन श्रीनिवास पाटील निवडून आले होते. भर पावसातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेतील भाषण सुरु ठेवत श्रीनिवास पाटील यांन निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्या निमित्ताने ही निवडणूक चांगलीच गाजली होती.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सातारा लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी पूर्ण वेळ देण्यासाठी सारंग पाटील यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पदवीधर मतदारसंघातून सारंग पाटील यांनी जोरदार तयारी केली होती, मात्र त्यांनी अचानक माघार घेतल्यानं इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सारंग पाटील यांच्यासह अरुण लाड, माणिक पाटील, श्रीमंत कोकाटे आणि उमेश पाटील यांचं नाव चर्चेत आहे. अरुण लाड गेल्या निवडणुकीतही रणांगणात उतरले होते. मात्र सारंग पाटील आणि लाड यांच्या मत विभाजनाचा फायदा चंद्रकांत पाटील यांना मिळाला होता. अरुण लाड यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.