
MLA Dharmarao Baba Atram On Ajit Pawar CM Post : “जर मला मुख्यमंत्रिपद देणार असे सांगितले असते, तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. यावरुन आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अजित पवार गटाचे नेते, आमदार आणि राज्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम याबद्दल एक मोठे विधान केले आहे. “अजित पवार जे बोलले ते खरंच आहे. त्यांना जर पहिली ऑफर दिली असती तर पूर्ण पक्ष घेऊन आले असते”, असे विधान धर्मरावबाबा अत्राम यांनी दिले आहे.
धर्मरावबाबा अत्राम यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “अजित पवार जे बोलले ते खरंच आहे. जर त्यांना पहिली ऑफर देण्यात आली असती, तर ते पूर्ण पक्ष घेऊन आले असते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री होण्याबद्दल जी खंत व्यक्त केली, ती बरोबर आहे. कारण त्यांनी ज्याप्रमाणे म्हटलं की पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो तर ते नक्कीच पूर्ण पक्ष घेऊन येऊ शकले असते. त्यांच्यात एवढी ताकद नक्की आहे”, असे धर्मरावबाबा अत्राम यांनी सांगितले.
“जर शरद पवारांना वाटलं असतं तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. जास्त जागा असतानाही त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले. त्यांना कुठेतरी डावललं गेलं. अजित दादा नेतृत्व करणारे नेते आहे. बजेटमधून त्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दादांना यापूर्वीही अनेकदा डावलण्यात आलं आहे. गेले 40 वर्ष संधी होती, तेव्हा शरद पवार साहेबांनी जर विचार केला असता माझा पुतण्या मुख्यमंत्री झाला पाहिजे तर ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही त्यांची घरातून डावलण्यात आल, याबद्दल खंत बरोबर आहे”, असेही धर्मरावबाबा अत्राम यांनी म्हटले.
“मात्र येणाऱ्या दोन अडीच महिन्यात निवडणूक होईल, त्या निवडणुकीत आमचा पक्ष आपली ताकद वाढवेल आणि त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री बनतील. अजित पवार वरिष्ठ आहेत. राजकारणात काहीही होतं, मात्र जेव्हा चांगला काळ होता आपला अधिकार होता तेव्हा त्यांना घरातून डावलण्यात आलं. आता हे महायुतीचा सरकार आहे. आम्ही तेव्हा मागे राहिलो म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळी सगळ्यांनी समर्थन दिला असते तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते”, असे धर्मरावबाबा अत्राम म्हणाले.