Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारण सोडणार? त्या विधानावर खुलासा काय? थेटच म्हणाले…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या 'नव्या पिढीला संधी' या विधानावरून त्यांच्या राजकारण सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, गडकरींनी आता यावर खुलासा केला आहे. त्यांचे विधान राजकारणाबद्दल नसून लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या 'एकल विद्यालय' कार्याशी संबंधित होते. ट्रस्टच्या भविष्यातील नेतृत्वासाठी त्यांनी हे मत व्यक्त केले, त्यामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारण सोडणार? त्या विधानावर खुलासा काय? थेटच म्हणाले...
nitin gadkari
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2026 | 3:50 PM

मी आता जास्त काम करू शकत नाही. आता नव्या पिढीलाच संधी दिली पाहिजे, असं विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरातील एका कार्यक्रमात केलं होतं. गडकरी यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. गडकरी राजकारण सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक तर्कवितर्कही लढवले जात होतेय. मात्र, आता नितीन गडकरी यांचा त्या विधानावर खुलासा आला आहे. माझं हे विधान लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या अनुषंगाने होतं, असा खुलासा करत गडकरी यांनी राजकारण सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण आलं आहे. नितीन गडकरी यांच्या कालच्या विधानाचा कोणताच राजकीय अर्थ नाहीये. त्या विधानाचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीये. नितीन गडकरी हे लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या संदर्भाने बोलत होते. या ट्रस्टच्या उभारणीत नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी भागात एकल विद्यालय चालवलं जात आहे. या संदर्भाने गडकरींनी कालचं विधान केलं होतं. मी फक्त संस्था उभी करण्याचं काम केलं. पण संस्था वाढवण्याचं खऱ्या अर्थाने काम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. मी आता जास्त काम करू शकत नाही. त्यामुळे या ट्रस्टच्या वाढीसाठी नव्या पिढीने पुढे आले पाहिजे. नव्या पिढीला संधी देऊन त्यांच्या अंगावर जबाबदारी दिली पाहिजे, असं गडकरी यांनी म्हटलं होतं, असं गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

केवळ आणि केवळ…

गडकरी यांचं विधान हे केवळ आणि केवळ ट्रस्टचं कामकाज आणि ट्रस्टच्या भविष्यातील नेतृत्वाशी संबंधित होतं. त्याचा काहीच राजकीय अर्थ नाहीये. शिवाय हा कार्यक्रम ट्रस्टचा होता. तो राजकीय नव्हता, असं गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

एकही गाव अंधारात नको

नागपूरच्या या कार्यक्रमात गडकरी यांनी विकास कार्याबद्दलही भाष्य केलं होतं. येणाऱ्या काळात विकासाचा परिघ वाढणार आहे. महाराष्ट्रातील कोणतंही आदिवासी गाव विजेपासून वंचित राहू नये. गावांमध्ये वीज असेल तर राज्यांचा विकास स्पष्ट दिसतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली होती. या टीममध्ये 65 सदस्य आहेत. त्यापैकी 51 नवीन चेहरे आहेत. भाजपमध्ये संघटनात्मक बदल झाल्यानंतर आता कॅबिनेटच्या विस्ताराचीही चर्चा रंगली आहे. नेमकं अशाच वेळी नितीन गडकरी यांचं हे विधान आल्याने त्याची राजकीय चर्चा सुरू झाली. मात्र, आता गडकरी यांच्या कार्यालयाने त्याचा खुलासा करत ते विधान केवळ ट्रस्टच्या कार्याशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे.

Follow Us