CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
दयानंद शेट्टीच्या या वक्तव्यामुळे सीआयडी मालिका बंद होण्यामागे नेमकं काय घडलं होतं, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मालिकेच्या पडद्यामागच्या राजकारणाचा हा दावा कितपत खरा आहे, यावर अधिकृत प्रतिक्रिया मात्र अद्याप समोर आली नाही.

टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय क्राइम शोपैकी एक असलेल्या ‘सीआयडी’ची क्रेझ आजही कायम आहे. 1998 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने तब्बल दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 2018 मध्ये हा शो बंद झाला आणि त्यानंतर चाहत्यांनी सातत्याने ‘सीआयडी’ परत आणण्याची मागणी केली. अखेर 2024 मध्ये या मालिकेनं पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. आता सीआयडीमध्ये दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीने शो अचानक बंद होण्यामागच्या कारणांचा खुलासा केला आहे.
‘सीआयडी’ का बंद झाला?
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत दयानंद शेट्टीने ‘सीआयडी’ बंद होण्यामागे ‘इंटर्नल पॉलिटिक्स’ (अंतर्गत राजकारण) असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या मते, शोच्या टीममध्ये असलेल्या काही अंतर्गत घडामोडींमुळे मालिकेवर परिणाम झाला. इतकी वर्षं प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असूनही सीआयडी बंद होणं कलाकारांसाठी आणि चाहत्यांसाठी धक्कादायक होतं. दयानंदने खुलासा केला की, सीआयडीमधील कलाकारांना मालिकेचे निर्माते खूप प्रिय होते. मात्र 2018 मध्ये चॅनलला निर्माते बदलायचे होते, ज्याला कलाकारांनी विरोध केला. “ही समस्या 2016 मध्ये सुरू झाली, जेव्हा चॅनलने कलाकारांच्या करारांची मागणी केली, तेव्हा निर्मात्यांनी सांगितलं की कलाकारांनी कधीही कोणत्याही करारावर स्वाक्षरी केली नव्हती”, असं त्याने पुढे सांगितलं.
लता मंगेशकरांनीही केली होती मालिकेसाठी मदत
यावेळी दयानंद शेट्टीने एक जुना किस्साही सांगितला. दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं ‘सीआयडी’चं विशेष प्रेम होतं आणि त्यांनी शोच्या टीमच्या बाजूने आवाजदेखील उठवला होता. “लताजी आमच्या खूप मोठ्या चाहती होत्या. त्या आमच्यावर प्रेम करायच्या. त्यांचा आम्हाला खूप मोठा आधार होता. जेव्हा शो बंद झाला, तेव्हाही त्या आमच्यासाठी लढल्या. म्हणजे त्यांनी सोनी अमेरिकेला फोन करून सुनावलं होतं. त्या म्हणाल्या, मी हा शो पाहते, तुम्ही तो का बंद करत आहात? तुमची अडचण काय आहे?”, असा किस्सा दयानंदने सांगितला.
सीआयडी या मालिकेनं 1998 ते 2018 या काळात भारतीय टेलिव्हिजनवर वेगळी ओळख निर्माण केली. तब्बल 20 वर्षांच्या प्रवासानंतर शो बंद झाला असला तरी त्याची लोकप्रियता कमी झाली नाही.
