मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची बंददाराआड चर्चा; चर्चेनंतर मुख्यमंत्री म्हणाले, भेटीमागे राजकीय समीकरण…

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली. पण इंदू मिल स्मारकाबाबत चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेटीमागे कोणतंही राजकारण नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची बंददाराआड चर्चा; चर्चेनंतर मुख्यमंत्री म्हणाले, भेटीमागे राजकीय समीकरण...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची बंददाराआड चर्चा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 16, 2022 | 3:55 PM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट झाली. दोन्ही नेत्यांनी या भेटी दरम्यान 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा गुलदस्त्यात असल्याने वंचित आणि शिंदे गट एकत्र येणार का? हा प्रश्न अंधातरीच राहिला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच या भेटीने राज्यात कोणतंही नवं राजकीय समीकरण निर्माण होणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचं ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन पाहिलं.

त्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी 15 मिनिटं चर्चा केली. ही चर्चा बंद दाराआड झाल्याचं सांगितलं जातं. यावेळी इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकावरही चर्चा करण्यात आली.

या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूत आल्यावर एक वेगळंच समाधान लाभलं. या वास्तूत बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू, त्यांचं ग्रंथालय अजूनही जसंच्या तसं आहे.

त्यांचा टेबलही आहे तसाच आहे. ही वास्तू बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे या इमारतीला पिल्लर नाहीत. हा सर्व आपला ऐतिहासिक ठेवा आहे, असं शिंदे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली. पण इंदू मिल स्मारकाबाबत चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेटीमागे कोणतंही राजकारण नाही. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. बाबासाहेबांची वास्तू पाहणं हाच भेटीचा हेतू होता. ही निव्वळ सदिच्छा भेट होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us