Ajit Pawar | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे कौतुक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा…. अजित पवारांची अधिवेशनातली टीका वाचली?

| Updated on: Aug 17, 2022 | 5:57 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अनुमोदन दिले. यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी अभिनंदन केले.

Ajit Pawar | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे कौतुक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा.... अजित पवारांची अधिवेशनातली टीका वाचली?
अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
Image Credit source: विधानसभा
Follow us on

मुंबईः आज देशातील अनेक राज्यपालांची ( Governor) भूमिका संशयाच्या घेऱ्यात असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राज्यपाल असताना अतिशय चोख कामगिरी बजावली. कोणत्याही राजकारणात त्या अडकल्या नाहीत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राष्ट्रपतींचं कौतुक करतानाच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अनुमोदन दिले. यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी अभिनंदन केले.

अजित पवारांचा निशाणा भगतसिंह कोश्यारींवर?

विधानसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना अजित पवारांनी राज्यपालांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. ते म्हणाले, ‘ द्रौपदी मुर्मू यांनी २०१५ रोजी झारखंड राज्याचं राज्यपाल पद हातात घेतलं. त्या पहिल्या अशा राज्यपाल होत्या की त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरदेखील पदावरून हटवण्यात आलं नव्हतं. मुर्मू यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखलं जातं. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर होता आणि आहे. आज अनेक राज्यपालांच्या भूमिकेवर संशय, शंका, वाद निर्माण होताना आपण पाहतो. पण मुर्मू या राज्यपाल पदाच्या कारकीर्दीत राजकीय वादातून दूर राहिल्या. राज्यपाल पदाच्या कारकीर्दीत त्यांनी घेतलेल्या काही भूमिकाही चर्चेत राहिल्या.

अधिवेशनात आज काय झालं?

राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर टीका केली. विधानभवन परिसरात सरकारमधील मंत्री आले असताना गद्दार आले… गद्दार आले… 50 खोके एकदम ओके.. अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्याला विरोधी पक्षनेत्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर काही काळ काकाज झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत असल्याचं सांगितलं. उद्या सकाळी 10 वाजता विशेष बैठक सुरु करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.