
परभणीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvsi) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक आमदार मंत्रिपदाच्या अपेक्षेने मंत्रालयाकडे डोळे लावून बसले आहेत. आमदारांसोबत त्यांचे समर्थकही आपल्याच नेत्याला मंत्रिपद मिळावे, यासाठी अनेक प्रकारे देवाचा धावा करत आहेत. परभणीच्या आमदार जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे (Meghana Bordikar) यांच्या समर्थकांनीही ग्रामदैवताला साकडं घातलं. आज मंगळवारी सकाळीच चारठाणा येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री गोकुळचरणी महारुद्र अभिषेक केला. गुरुजींच्या साक्षीने मेघनाताईंना मंत्रिपद मिळावं, यासाठी अनेक समर्थकांनी प्रार्थना केली. परभणी जिल्ह्यातून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यापैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी परभणीतील भाजप समर्थकांकडून वेगवेगळ्या प्रकारे मागणी करण्यात येत आहे. भाजपातील पक्षश्रेष्ठींनी मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद द्यावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आज सकाळी चारठाण येथे श्री गोकुळचरणी ग्रामस्थांनी महारुद्र अभिषेक केला.
परभणी जिल्ह्यात रामप्रसाद बोर्डीकर यांचं मोठं प्रस्थ आहे. 25 वर्षे काँग्रेसची आमदारकी भूषवल्यानंतर त्यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला. 1985 पासून जिंतूर पालिका, पंचायत समिती, बाजार समितीपासून थेट मुंबई बाजार समितीचे सभापतीपद त्यांनी भूषवले आहे. आता त्यांची राजकीय वारसदार म्हणून मेघना बोर्डीकर यादेखील भाजपात तितक्याच सक्रिय नेत्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. जिंतूर मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विजय माणिकराव भमाले यांचा 3717 मतांनी पराभव केला. जिंतूर आणि एकूणच परभणी भाजपातील राजकारणातील सक्रिय नेत्या म्हणून त्या लोकप्रिय आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावातील साकोरे कुटुंबातील त्या सूनबाई आहे. आमदार बोर्डीकर यांचे पती दीपक साकोरे यांच्यासह त्यांच्या परिवारातील अनेक जण मंत्रालय स्तरावर उच्चाधिकारी आहेत.
राज्यात महत्प्रयासानंतर सत्ता मिळवल्यानंतर भाजपदेखील पुढील निवडणुकांच्या अनुशंगाने मोठ्या सावधगिरीने पावले टाकत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातून मंत्रिपद कुणाला द्यायचे, हा प्रश्नही विचारपूर्वक मार्गी लावला जाईल. जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासोबत गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे हेदेखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. आगामी निवडणुकांसाठी छोट्या पक्षांना संधी देण्याच्या उद्देशाने रत्नाकर गुट्टे यांनाही मंत्रिपद मिळू शकते, अशी शक्यता काही जाणकार व्यक्त करत आहेत.