‘मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे विरोधी पक्षांचे दु:खी आहे मन’! रामदास आठवलेंचा विरोधकांना टोला

| Updated on: Jun 22, 2021 | 7:36 PM

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर केंद्रीय राज्य मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलंय. 4 ओळींच्या माध्यमातून आठवले यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावलाय.

मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे विरोधी पक्षांचे दु:खी आहे मन!  रामदास आठवलेंचा विरोधकांना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Follow us on

मुंबई : भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचं काम शरद पवार यांच्या नेतृत्वात सुरु असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज राष्ट्रमंचची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधणं किंवा काँग्रेसला डावलून तिसरी आघाडी निर्माण करण्याचा कुठलाही प्रयत्न नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रमंचकडून देण्यात आलं आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर केंद्रीय राज्य मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलंय. 4 ओळींच्या माध्यमातून आठवले यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावलाय. (PM Narendra Modi’s praise from Union Minister of State Ramdas Athavale)

‘मोदी आहेत नंबर वन; त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन ! मोदी देणार आहेत सर्व राज्यांना विकासासाठी धन; म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा 2024 चा क्षण!’ असं ट्वीट करत रामदास आठवले यांनी काँग्रेससह सर्व विरोधकांवर टोला हाणलाय. याआधी शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात मुंबईमध्ये बैठक पार पडल्यानंतर रामदास आठवले यांनी त्यावर भाष्य केलं होतं. पवार आणि किशोर यांची भेट झाली असली तरी मोदींना हरवणं सोपं नाही. 2024 ला मोदींच्याच नेतृत्वात सत्ता येईल, असा दावा आठवले यांनी केला होता.

‘जनता पार्टीसारखा प्रयोग मोदींबद्दल होणं शक्य नाही’

नरेंद्र मोदी हे स्ट्रॉंग नेते आहेत. प्रशांत किशोर यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना काही शक्य होणार नाही. प्रत्येकाला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, असं आठवले म्हणाले होते. विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं असं काहींचं म्हणणं आहे. पण ते शक्यत होणार नाही. काँग्रेसविरोधात जसा जनता पार्टीचा प्रयोग झाला तसा मोदींबद्दल होणं शक्य नाही, किंबहुना आम्ही तो होऊ देणार नाही, अशा इशाराच आठवले यांनी विरोधकांना दिला होता. इतकंच नाही तर 2024 ला भाजपच्या 303 नाही तर 350 जागा आम्ही निवडून आणू, असा दावाही त्यांनी यावेळी केला होता.

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता महायुतीचे नेतेही पंतप्रधानांना भेटणार; रामदास आठवलेंचं मोठं विधान

पदोन्नती आरक्षणप्रश्नी रामदास आठवलेंकडून शरद पवारांची भेट, बैठकीत नेमकं काय ठरलं?

PM Narendra Modi’s praise from Union Minister of State Ramdas Athavale