15 दिवस थांबा, इंडिया आघाडीतून… प्रकाश आंबेडकरांच्या भाकिताने राजकारणात खळबळ!

राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेला फार महत्त्व आहे. त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचे परिणाम हे इतर पक्षांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भोगावे लागतात. दरम्यान, त्यांनी आता पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर सडकून टीका केली आहे.

15 दिवस थांबा, इंडिया आघाडीतून... प्रकाश आंबेडकरांच्या भाकिताने राजकारणात खळबळ!
prakash ambedkar
| Updated on: Aug 07, 2025 | 7:07 PM

Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेला फार महत्त्व आहे. त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचे परिणाम हे इतर पक्षांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भोगावे लागतात. दरम्यान, त्यांनी आता पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर सडकून टीका केली आहे. तसेच मोदींचे राजकारण हेड डरपोक आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानचे पाच तुकडे झाले असते, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तसेच इंडिया आघाडीबाबत 15 दिवसांत वेगळी बातमी येणार आहे, असाही मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.

भाजपा आणि मोदींची भाषा ही…

प्रकाश आंबेडकर हे पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये एकही देश आपल्या बाजूने नव्हता. यात रशियासारखा मित्र आपण गमावला आहे. भाजपा आणि मोदींची भाषा ही रशियावर उपकार करतोय अशी आहे. म्हणून सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर पाकिस्तानला मदत करू अशी भूमिका रशियाने घेतली. पाकिस्तानचा लोखंडी कारखाना सुरू करून दिला, अशी जळजळीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

भविष्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वस्तूंवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा टॅरिफ मोदींमुळेच लागला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. सध्या सर्वात जास्त टॅरिफ वस्त्रोद्योगावर आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगात बेरोजगारी वाढणार आहे. आता बाजारातून डॉलर विकत घ्यावे लागणार आहेत. भविष्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण येणार आहे, असं भाकितही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले.

देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मोदी यांच्यावरही सडकून टीका केलीय. मोदींपासून देश वाचवा. 140 कोटी जनतेपैकी कोणीतरी देश चालवायला पुढे येईल. देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. उलाढालीत आपण चौथ्या क्रमांकावर आहोत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

शरद पवार हे भाजपाचे हस्तक

प्रकाश आंबेडकरांनी पुडे बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार हे भाजपाचे हस्तक आहेत. त्यामधून ते बाहेर पडू शकत नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील न्यायालयीन वादावर बोलताना सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला आहे असे कधी ऐकले आहे का ? आता ठाकरे, पवार यांच्या पक्षाबद्दल निर्णय झालाय. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलणार नाही. विधानसभेत शिंदे आणि अजित पवारांच्या बाजूने अधिक मतदान झाले आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. आठवले भाजपचे मंत्री आहेत. आरपीआय आता शिल्लक कुठे राहिली आहे, असा टोलाही त्यांनी रामदास आठवलेंना लगावला.  पुढे इंडिया आघाडीवर बोलताना 15 दिवसात इंडिया आघाडी बाबत वेगळी बातमी येणार असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळेच आता ही वेगळी बातमी काय असणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.