
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पुणे, मुंबई तसेच अनेक महत्त्वाच्या शहरांमधील बडे नेते आपल्या सोईनुसार वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे एखाद्या बड्या नेत्याला पक्षात घेऊन एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही राजकीय पक्षांकडून केला जात आहे. ज्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे किंवा आपली उमेदवारी निश्चित आहे, असे मानणारे नेतेमंडळी निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. आपल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा उमेदवारांमध्ये चांगलीच शर्यत रंगली आहे. असे असतानाच आता पुणे महानगरपालिकेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवांकडून मतदारांना दिलेल्या आश्वासनांची आणि ऑफर्सची सगळीकडे चर्चा होत आहे. उमेदवारांनी हेलिकॉप्टर राईड, एक गुंठा जमीन अशा प्रकारची प्रलोभनं दिली आहेत.
पुण्यात उमेदवारांकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफरे पोस्टरही व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात फक्त एकाच उमेदवाराने ही ऑफर दिलेली आहे, असे नाही तर वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवारांनी वेगवेगल्या ऑफर दिल्या आहेत. चारचाकी, हेलिकॉप्टर राईड, थायलंड सहल, एक गुंठा जमीन अशा ऑफर्सचा यात समावेश आहे. धानोरी प्रभाग क्रमांक एकमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यशाली मतदाराला एक गुंठा जमीन दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय.
तर दुसरीकडे कसब्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये पैठणीचा खेळ जिंकणाऱ्या महिलांना हेलिकॉप्टरची राईडची ऑफर देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये इच्छूक उमेदवाराकडून परदेशवारीचे आमिष दाखवण्यात आले आहे. या सर्वच भन्नाट ऑफर्सची सध्या पुण्यात सगळीकडे चर्चा होत आहे. या ऑफर्सचे पोस्टरही सगळीकडे व्हायरल होत आहे.
दरम्यान, पुण्याच्या महापालिकेवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. इथे अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी गटांची चांगली ताकद आहे. दुसरीकडे या भागात भाजपाला मानणारावर्गही मोठा आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभनं दिली जात असली तरी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.