राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार, हायकमांडला निर्णय कळवला?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकावर एक धक्के सुरुच आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे विखे पाटीलही आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते या पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनाही फोनवरुन कळवल्याची माहिती आहे. पक्षश्रेष्ठींनी सुजयविषयी […]

राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार, हायकमांडला निर्णय कळवला?
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकावर एक धक्के सुरुच आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे विखे पाटीलही आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते या पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनाही फोनवरुन कळवल्याची माहिती आहे.

पक्षश्रेष्ठींनी सुजयविषयी ठोस भूमिका न घेतल्याने राधाकृष्ण विखे पाटील पक्षात नाराज आहेत. त्यामुळेच ते विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलंय. विखे पाटलांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी फोनवरुन बातचीत करत हा निर्णय त्यांना कळवल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच आपण हायकमांडशी चर्चा करुन निर्णय कळवू, असं खर्गेंनी म्हटल्याचीही माहिती आहे.

राधाकृष्ण विखे पाटील नाराज

विखे आणि पवार यांच्यातील वाद जुना आहे. हाच वाद लक्षात घेत शरद पवार यांनी सुजयसाठी ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. शरद पवार हे आम्हाला पितृतुल्य असून त्यांना सुजयला नातू समजून संधी द्यावी, असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं होतं. पण पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत जुन्या संघर्षाचा दाखला दिल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणखी नाराज झाल्याचं बोललं जातंय.

सुजय विखेंचा भाजपात प्रवेश

सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे पाटीलही हजर होत्या.

मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय विखे पाटलांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘एकच वादा, सुजय दादा’ अशा घोषणा देत गरवारे क्लब सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. नगरमधून मोठ्या संख्येत सुजय विखेंचे समर्थक या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.