Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ औरंगाबादेत धडाडणार, औरंगाबाद पोलिसांची सभेला अखेर परवानगी

राज ठाकरेंची तोफ औरंगाबादेत धडाडणार हे आता निश्चित झालं आहे, कारण औरंगाबाद पोलिसांनी सभेला अखेर परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही सभा चर्चेत आहे. अनेक संघटनांकडून या सभेला विरोध करण्यात आला होता.

Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ औरंगाबादेत धडाडणार, औरंगाबाद पोलिसांची सभेला अखेर परवानगी
औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 28, 2022 | 8:49 PM

औरंगाबाद : राज ठाकरेंची (Raj Thackeray) तोफ औरंगाबादेत (Aurangabad Mns) धडाडणार हे आता निश्चित झालं आहे, कारण औरंगाबाद पोलिसांनी सभेला अखेर परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही सभा चर्चेत आहे. अनेक संघटनांकडून या सभेला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसही (Aurangabad Police) विचार करत होते. मात्र पोलिसांच्या या सभेवरून आणि लोकांच्या सुरक्षेवरून अनेक बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यातही अनेक बैठका झाल्या आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही औरंगाबादेत दाखल होत मैदानाची पाहणी केली होती. आणि औरंगाबाद पोलिसांनीही सुरक्षेच्या कारणास्तव या मैदानाची पाहणी केली होती. या सर्व मोठ्या घडामोडी घडल्यानंतर अखेर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे.

सभेसाठी काही अटीशर्ती असणार

  1. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या सभेला पोलिसांनी काही अटी घालून दिल्या आहेत. त्यात कायदा आणि सुव्यस्थेची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि प्रक्षोभक भाषण होऊ नये, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला होता, राज ठाकरे यांच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल असा आरोप या संघटनांकडून करण्यात आला होता.
  2. या सभेच्या वेळेत कोणताही बदल करू नये असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
  3. सभेत येणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, कोणतीही हुल्लडबाजी, प्रक्षोभक घोषणाबाजी करू नये.
  4. सभेसाठी येणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलता येणार नाही, त्यामुळे वाहतुकीच्या अडचणी होणार नाहीत. तसेच कोणतीही रॅली काढता येणार नाहीत.
  5. या सभेबाबत नागरिकांना जागृत करण्याची जबाबदारी ही आयोजकांची असेल, असेही सांगण्यात आले आहे.
  6. या सभेसाठी आयोजकांनी स्वयंसेवकांची नेमणूक करावी, तसेच येणाऱ्या लोकांच्या संख्येबाबत आणि वाहनांच्या संख्येबाबत पोलिसांना कळवण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.
  7. या मैदानातील आसनमर्यादा ही पंधरा हजार असल्याने त्यापेक्षा जास्त लोकांना निमंत्रण देऊ नये.
  8. पोलिसांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी मजबूत बॅरिकेट उभारावी
  9. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, धर्म, भाषा, वर्ण, प्रदेश जन्मस्थान, धर्म यावरून चिथावणीखोर वक्तव्य करू नये.
  10. या सभेसाठी वापरण्यात येणारे ध्वनीक्षेपक बाबत सर्वोच्चे न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करने बंधनकारक असेल.