तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि आता राजस्थान, काँग्रेसमध्ये पुन्हा फूट

| Updated on: Jul 11, 2019 | 5:53 PM

जनतेने अशोक गहलोत यांच्या नावावर मत दिलं नाही, असा आरोप सचिन पायलट यांनी केलाय, तर गहलोत यांनीही हाच आरोप सचिन पायलट यांच्यावर केल्याने अंतर्गत डोकेदुखी वाढली आहे.

तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि आता राजस्थान, काँग्रेसमध्ये पुन्हा फूट
Follow us on

जयपूर : काँग्रेसला सध्या फुटीचं ग्रहण लागलेलं असताना राजस्थानमध्येही अंतर्गत गट समोर आले आहेत. आतापर्यंत एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका करणारे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे आमनेसामने आले आहेत. जनतेने अशोक गहलोत यांच्या नावावर मत दिलं नाही, असा आरोप सचिन पायलट यांनी केलाय, तर गहलोत यांनीही हाच आरोप सचिन पायलट यांच्यावर केल्याने अंतर्गत डोकेदुखी वाढली आहे.

कुठे काय आणि किती बोलायचं यासाठी अशोक गहलोत ओळखले जातात. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पायलट यांना थेट इशारा दिला. सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा बाळगू नये, असं गहलोत स्पष्टपणे म्हणाले. विधानसभेत लोकांनी माझ्या नावावर मला मुख्यमंत्री बनवण्यासाठी मतदान केलं. त्यामुळेच पक्षाने हे पद मला दिलं. दुसऱ्याच्या नावावर मतं मिळालेली नाहीत. जे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीतही नव्हते, ते आता स्वतःचं नाव पुढे ढकलत आहेत, असं गहलोत म्हणाले.

सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अभियान चालू केलं असल्याचा गहलोत यांना संशय आहे. त्यामुळेच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी थेट आर-पारची भाषा वापरली. राजस्थानचा बॉस मी स्वतःच आहे आणि असेल, असा सूचक इशारा त्यांनी दिलाय.

सचिन पायलट हे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे राजस्थानमधील विजयाचं श्रेय त्यांनाही दिलं जातं. त्यामुळेच सत्ता आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला सर्वोच्च पद दिल्याची खंत त्यांच्या मनात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्याला संधी देतील, अशी अपेक्षा सचिन पायलट यांना आहे. पण अशोक गहलोत यांची राजकीय कारकीर्द पाहता ते तडजोडीच्या राजकारणात मास्टर मानले जातात.

राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला होता. राजस्थानच्या 25 पैकी सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे अशोक गहलोत यांच्या मुलाचाही पराभव झाला होता.