आठवले म्हणाले, पवारसाहेब सल्ला द्या, शरद पवारांनी खास सल्ला दिला!

आठवलेंनी पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन, त्यांची भेट घेतली. यावेळी आठवलेंनी (Ramdas Athawale meets Sharad Pawar) सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा सल्ला विचारला.

आठवले म्हणाले, पवारसाहेब सल्ला द्या, शरद पवारांनी खास सल्ला दिला!
| Updated on: Nov 08, 2019 | 3:34 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale meets Sharad Pawar) यांची आज भेट झाली. आठवलेंनी पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन, त्यांची भेट घेतली. यावेळी आठवलेंनी (Ramdas Athawale meets Sharad Pawar) सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा सल्ला विचारला. त्यावर पवारांनी सेना-भाजपनेच सरकार स्थापन करायला हवं असं आठवलेंना सांगितलं.

पवार म्हणाले, “सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती दुरुस्त व्हावी, एवढ्या मोठ्या राज्यात इतके दिवस सरकार नाही, हे योग्य नाही. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या जीवनावर होईल. याची चिंता आठवलेंनाही आहे. त्यामुळे ते सल्ला विचारण्यासाठी आले होते. आमच्या दोघांचं एकमत आहे, की या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं आहे.त्यामुळे त्यांनी लवकर सरकार बनवावं. महाराष्ट्रात स्थिरता येईल याची काळजी त्यांनी घ्यावी. असं माझं मत मी आठवलेंना सांगितलं. त्यांचंही तेच आहे. त्या दृष्टीने त्यांनी अधिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा माझी आहे”.

संसदेत आरपीआयचे खासदार किती आहेत यापेक्षा रामदास आठवले यांचं राजकीय पक्षांमध्ये एक वेगळं स्थान आहे. त्यांनी काही मत मांडलं, तर सत्ताधारी गांभिर्याने घेत असतात. त्यामुळे आजच्या या परिस्थितीत त्यांचा हा सल्ला महाराष्ट्राच्या हिताचा राहिल, तो त्यांनी भाजप आणि शिवसेनेला द्यावा, अशी सूचना मी आठवलेंना केली. मला विश्वास आहे की त्यासंबंधीची काळजी ते घेतील, असं शरद पवार म्हणाले.

राज्यपालांनी निर्णय घ्यावा

सद्यपरिस्थितीत राज्यपालांना निर्णय घ्यावा लागेल. यापूर्वी अशी परिस्थिती आली, तर राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण द्यायला हवं, असं शरद पवार म्हणाले.

आम्ही काही भूमिका घेणार नाही, आम्ही केवळ सल्ला देऊ, सर्वात मोठ्या पक्षाने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, असं पवार म्हणाले.

शिवराज पाटलांना शिवसेनेचा पाठिंबा चालेल का?

ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, त्याला इतरांनी म्हणजेच शिवसेनेने पाठिंबा द्यावा, असं म्हटलं. त्याबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालणार आहे का?

आठवले आणि आम्ही सभागृहात सोबत असतो. राज्यातील कोंडी कशी फेडायची याबाबत चर्चा करण्यासाठी आठवले आले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. कोंडी फोडण्यासाठी त्यांची भूमिका योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले.