
औरंगाबाद : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) तोंडावर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणुकीत अधिक वेगवान घडामोडी घडत आहेत. आज महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच आता हे सर्व आमदार मतदानापर्यंत हॉटेलमध्येच मुक्कामी असणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलीय. ‘महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था मांजरांच्या पिलांसारखी झाली आहे’, असा टोला दानवेंनी लगावलाय.
रावसाहेब दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबादला होत आहे तो त्यांचा राजकीय विषय आहे. पण भाजपचे राज्यसभेसाठी जो तिसरा उमेदवार उभा केला आहे तो नक्की निवडून येईल याबाबत आमच्या मनात कुठलिही शंका नाही. त्यांनी कितीही मोर्चेबांधणी करु द्या. गेल्या दोन चार दिवसांत त्यांनी बोलावलेल्या बैठकीला अपक्ष आमदार उपस्थित नव्हते. अपक्षांच्या भरवश्यावर ते सत्तेत आहेत तर त्याच अपक्षांवर यांनी अविश्वास का दाखवावा? का त्यांना एका हॉटेलमध्ये बंदिस्त करुन ठेवलं? हॉटेलमध्ये बंद करुन जर ते मतं घेत असतील म्हणजे यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. यांनी आमदारांना मोकळं सोडलं पाहिजे. मग बघितलं पाहिजे की अपक्ष आमदारांचं सरकारबाबत काय मत आहे. त्यांना आमची भीती नाही तर हे अपक्ष आमदार आपल्याला कधीही सोडून जाऊ शकतात याची त्यांना भीती आहे, अशा शब्दात दानवेंनी मविआ सरकारची खिल्ली उडवली.
त्याचबरोबर ‘आमच्याकडे सर्वाधिक मतं आहेत. अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे, त्यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अपक्षांच्या मतांची गॅरंटी नाही. त्यांना मत कुठेही द्यायचा अधिकार आहे. त्यांनी कोंडून ठेवलं तरी भाजपलाच मते मिळतील. भाजपचे उमेदवार निवडून येतील. बैठकीचा काही फायदा होणार नाही. आज हॉटेल बदलले आहे. मांजर जसं पिल्लाला या घरातून त्या घरात नेत असते तशी हालत करून ठेवली आहे’, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर केलीय.
दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतील उद्याच्या सभेवरही टीका केलीय. ‘ज्या दिवशी ते सरकारमध्ये सामील झाले तेव्हा पासून लोक विचार आहेत, तुम्ही हे राज्य अडीच वर्षात राज्याला कुठे नेऊन ठेवलं. शेतकऱ्यांना मदत केली किती, आमच्या योजना बंद केल्या किती, तुमच्या किती योजनांची अंमलबजावणी केली आहे. हे लोक विचारत आहेत’, असं दानवे म्हणाले.