Eknath Shinde : निलंबनाच्या संभाव्य कारवाई विरोधात बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका दाखल – सूत्र

| Updated on: Jun 26, 2022 | 7:51 PM

झिरवळ यांनी याबाबत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नोटीस पाठवून उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिलाय. सोमवारी हा वेळ संपतोय. अशावेळी शिंदे गटाकडून संभाव्य कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Eknath Shinde : निलंबनाच्या संभाव्य कारवाई विरोधात बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका दाखल - सूत्र
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर आता शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतलाय. शिंदे यांच्यासह 16 आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता शिवसेनेकडून करण्यात आलीय. त्यासाठी अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे 16 पिटिशनही दाखल केले आहेत. झिरवळ यांनी याबाबत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नोटीस पाठवून उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिलाय. सोमवारी हा वेळ संपतोय. अशावेळी शिंदे गटाकडून संभाव्य कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील ज्या 16 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात उद्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे पिटिशन दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी या आमदारांना दोन दिवसांत उत्तर देण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्तावही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, यावरुन राज्यातील पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.

बंडखोर आमदारांवरील कारवाईबाबत पवारांचे सूचक संकेत

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे 16 पिटिशनही दाखल करण्यात आलेत. त्यानंतर झिरवळ यांनी या 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तशी कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे या बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. त्यावेळी बंडखोर आमदार, मंत्र्यांवर आज किंवा उद्या कठोर कारवाई होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

आज-उद्या कारवाईची शक्यता?

सरकार बनलं तेव्हा लोक अडीच महिने चालेल सहा महिने चालेल असं सांगितलं जात होतं. पण आम्ही अडीच वर्ष पुर्ण केली. अजुनही सरकार चालंल पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही पार पाडत आहोत. पाहू आमदार आल्यावर अंदाज येईल, असं पवार म्हणाले. त्यावेळी पत्रकारांनी बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला. तेव्हा मंत्र्यांचा राजीनामा मी घ्यायचा का. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. ते घेतील, आज उद्या कधी तरी घेतील, असे सूचक संकेत त्यांनी दिलेत.