अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या निव्वळ अफवा, सरकारची माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज फिरत आहेत. या सर्व अफवांवर पूर्णविराम लावत व्हायरल होणाऱ्या पोस्ट या खोट्या आणि तथ्यहीन असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. पीआयबीचे मुख्य संचालक सितांशू कर यांनी ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं. “मीडियामध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अस्वस्थ असल्याच्या ज्या बातम्या […]

अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या निव्वळ अफवा, सरकारची माहिती
| Updated on: May 26, 2019 | 8:43 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज फिरत आहेत. या सर्व अफवांवर पूर्णविराम लावत व्हायरल होणाऱ्या पोस्ट या खोट्या आणि तथ्यहीन असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. पीआयबीचे मुख्य संचालक सितांशू कर यांनी ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं.

“मीडियामध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अस्वस्थ असल्याच्या ज्या बातम्या फिरत आहेत, त्या पुर्णपणे चुकिच्या आणि तथ्यहीन आहेत. मीडियाने अशा अफवांपासून दूर राहावे”, असं ट्वीट सितांशू कर यांनी केलं.


वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनीही या प्रकरणी ट्वीट केलं. “माझे मित्र अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत सर्वजण चर्चा करत आहेत. काही जणांना खरंच काळजी आहे, तर काही जण विचित्र गोष्टी बोलत आहेत. मी शनिवारी (25 मे) सायंकाळी त्यांना भेटलो. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण, सध्या त्यांच्या मित्रांनी आणि जवळच्यांनी त्यांना लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे”, असं ट्वीट रजत शर्मा यांनी केलं.

नव्या सरकारकडून सादर करण्यात येणाऱ्या 2019-20 च्या बजेटबाबत शुक्रवारी अरुण जेटली यांनी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक अरुण जेटलींच्या घरी घेण्यात आली होती. अरुण जेटली हे गेल्या अनेक काळापासून किडनीसंबंधी आजारापासून ग्रस्त आहेत. गेल्या वर्षी जेटलींचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं. प्रकृती अस्वस्थ असल्याने जेटली हे शुक्रवारी (24 मे) मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकिलाही उपस्थित राहु शकले नाहीत.

नव्या मंत्रिमंडळात जेटलींऐवजी गोयल?

नव्या सरकारमध्ये अर्थ मंत्रालयावरील कामकाजाचा बोजा वाढणारा आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटलींना हा कार्यभार कितपत पेलवेल ही शंका आहे. याच जानेवारी महिन्यात जेटलींना वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जावं लागलं होतं. त्यावेळी पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात पियुष गोयल यांचं नाव अर्थमंत्रीपदासाठी पक्कं झाल्याची कुजबूज आहे.