भाजपचं गुणगान गाणाऱ्या चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांकडून समाचार

पक्ष सोडताना तत्त्व नाही, तर सत्तेचं लोणी दिसलं होतं, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

भाजपचं गुणगान गाणाऱ्या चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांकडून समाचार
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ
| Updated on: Nov 11, 2019 | 1:33 PM

मुंबई : भाजपचा विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय अभिमानास्पद आहे, सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे, असं ट्वीट करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. पक्ष सोडताना तत्त्व नाही, तर सत्तेचं लोणी दिसलं होतं, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवरुन चित्रा वाघ यांच्यावर (Rupali Chakankar on Chitra Wagh) नाव न घेता निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नसल्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं.

‘आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!’ हे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर अकाऊण्टवरुन पोस्ट करण्यात आलं. हे ट्वीट कोट करत चित्रा वाघ यांनी ‘सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे….अभिमानास्पद निर्णय !!!’ असं लिहिलं. ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार यांना मेन्शन केलं होतं.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी वाघ यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

‘संजय राऊतांना काही दिवसांत शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील’

चित्रा वाघ यांच्या ट्वीटवरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ‘देर आये…दुरूस्त आये. ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही, जी आता आठवायला लागलेत, त्यावेळी फक्त सत्तेचे लोणी दिसत होते…..पराजय मान्य करायला वृत्ती खिलाडू असावी लागते….’ अशी पोस्ट चाकणकरांनी (Rupali Chakankar on Chitra Wagh) केली आहे.