
मुंबई | 03 ऑगस्ट 2023 : मागच्या काही दिवसात समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. अशातच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या अपघातांच्या वाढत्या संख्येवर भाष्य करण्यात आलं आहे. समृद्धी महामार्ग, रक्त आणि अश्रू या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. अपघातांची मालिका सुरू असताना या महामार्गाला ‘समृद्धी’ कसं म्हणणार? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
‘समृद्धी’ महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या ‘मृत्यू’ने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे.
सोमवारच्या दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले. राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. या महामार्गाचे कर्ते-धर्ते हेच आज राज्याचे मुख्य आणि उपमुख्य आहेत. त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?
नावात ‘समृद्धी’ असलेल्या महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांची मालिका थांबायला तयार नाही. ज्या समृद्धीच्या वल्गना या महामार्गाच्या निर्मात्यांनी केल्या ती समृद्धी कधी येणार, हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु या महामार्गावरील अपघात, दुर्घटना आणि निरपराध्यांच्या बळींमध्ये मात्र दिवसेंदिवस ‘वृद्धी’च होत आहे.
गेल्याच महिन्यात या महामार्गावर खासगी ट्रव्हल्स बसच्या भीषण अपघातात सुमारे 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. आता शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना सोमवारी मध्यरात्री भयंकर दुर्घटना घडली. त्यात 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला. आता या दुर्घटनेची चौकशी करण्याचा सोपस्कार राज्य सरकारने केला आहे. नुकसान भरपाई जाहीर केली आहे. राज्यकर्त्यांनी दुःख वगैरे व्यक्त केले, पण अशी वेळ समृद्धी महामार्गाबाबत वारंवार का येत आहे, याचा विचार तुम्ही कधी करणार आहात?
समृद्धी महामार्गावरील आजवरच्या अपघातांमध्ये मरण पावलेल्यांच्या किंकाळय़ा, त्यांच्या नातलगांचा आक्रोश यामुळे ना सरकारच्या कानाचे पडदे फाटत आहेत ना हृदयाला पाझर फुटत आहे. ‘समृद्धी’ महामार्ग हा म्हणे सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? पुन्हा समृद्धी येणार वगैरे ‘दिवास्वप्न’च आहेत.