भगवा उतरवणं सोडून द्या, आधी पालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून बघा; उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला

| Updated on: Nov 27, 2020 | 9:50 AM

"हिंमत असेल तर जम्मू-कश्मीरमध्ये तिरंगा फडकवा", असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिले आहे.

भगवा उतरवणं सोडून द्या, आधी पालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून बघा; उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. महापालिकेवर झेंडा फडकवण्याची तयार करत असलेल्या भाजपवर ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. (Uddhav thackeray Slams BJP over BMC Election)

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईकरांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी महापालिकेच्या गडाभोवती आहे, म्हणून ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. भगवा उतरवणं सोडून द्या, त्याआधी त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. कारण माझ्या मुंबईकरांच्या प्रेमाची आणि विश्वासाची भक्कम तटबंदी या मुंबईच्या आणि महापालिकेच्या सभोवती आहे आणि तिच्यावर मुंबईकरांनी फडकवलेला भगवा कुणालाही जवळपास येऊ देणार नाही.

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले की, “शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही असे त्यांचे (भाजपचे) म्हणणे आहे. हा भगवा शुद्ध नाही याची व्याख्या तुम्ही कशी कराल?” शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही म्हणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “शिवसेनेच्या भगव्यावरुन सवाल करणाऱ्यांनी बिहारमध्ये काय फडकवलंय? तिकडे कोणतं फडकं फडकवलंय?” मग तिकडे का नाही भगवा फडकवत तुम्ही? असे सवाल ठाकरे यांनी उपस्थित केले.

“हिंमत असेल तर जम्मू-कश्मीरमध्ये तिरंगा फडकवा”, असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिले. “काश्मिरात डोळे वर करुन बघण्याची हिंमत होत नाही. इतर ठिकाणी जी फडकवलीत ती फडकी कोणती आहेत तुमची? ती शुद्ध आहेत का? कोणा कोणाबरोबर कशा युत्या केल्यात तुम्ही? कशी तडजोड केलीत? बिहारमध्ये ‘संघमुक्त भारत’ म्हणणाऱ्या नितीशकुमारांसोबत तुम्ही युती केली, तो भगवा कोणता आहे तुमचा? आधी भगवा आहे का तुमच्याकडे?” असे अनेक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) मुंबई महानगरापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (BMC Election) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य जाहीर केलं आहे. या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपनं कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती केली आहे.

संबंधित बातम्या 

सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता?; ईडीच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सवाल

मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

(Uddhav thackeray Slams BJP over BMC Election)