‘अदानींचा फुगा फुटलाय, त्यात हवा भरण्याचं पाप करू नका, विरोधकांची वज्रमूठ आवळा’,सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात

| Updated on: Feb 07, 2023 | 9:17 AM

जनता हिशेब मागत असताना मोदी यांची मन की बात शांत, अशा वेळी विरोधकांनी शांत बसू नये, असे आवाहन सामनातून करण्यात आले आहे.

अदानींचा फुगा फुटलाय, त्यात हवा भरण्याचं पाप करू नका, विरोधकांची वज्रमूठ आवळा,सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या समूहाची फसवेगिरी हिंडेनबर्ग (Hindenburg) संस्थेने उघड्यावर आणली आहे. पण गोदी मीडिया फक्त अमेरिकेने चीनचा जासुसी फुगा फोडल्याला महत्त्व देत आहे, अशी टीका शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. पण विरोधकांनी या प्रश्नावर एकत्र यावे. मोदी सरकारविरोधात विरोधकांची वज्रमूठ हेच प्रखर हत्यार आहे. ते बोथट करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहेत यासाठी पैसे आले कुठून याचं उत्तर अदानींच्या फुटलेल्या फुग्यातून मिळेल, अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे. असे असले तरीही विरोधकांनी आता शांत न राहता एकजुटीने या विरोधात आवाज उठवायला पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.

‘भाजपचे आर्थिक संरक्षक’

संपादक संजय राऊत यांनी या अग्रलेखातून गौतम अदानी यांना भाजपचे आर्थिक संरक्षक गौतमभाई अदानी असे म्हटले आहे. अदानींच्या साम्राज्याचा फुगा आता साफ फुटला आहे. त्यांच्या साम्राज्यात भाजपने हवा भरली. राष्ट्रवाद, हिंदुत्वाचा वगैरे मुद्दा आणला. अदानींचा फुगा फोडण्यामागे आंतरराष्ट्रीय तसेच देशद्रोही शक्ती असल्याचं संघाला वाटतं. हा तर्कच मजेदार असल्याचं भाष्य अग्रेलेखातून करण्यात आलंय.

‘पहिली टाचणी राहुल गांधींची’

अदानी यांच्या फुग्याला पहिली टाचणी राहुल गांधी यांनी लावल्याचंही अग्रलेखात म्हटलं गेलंय. राहुल गांधी यांनी संसदेत तसेच बाहेरही अदानी-अंबानी-मोदी संबंधांवर अनेकदा हल्ला केलाय. भारत जोडो यात्रेदरम्यान, अर्थतज्ज्ञ रघुरामन राजन गांधी यांच्याबरोबर चालले. त्यावेळीही राहुल गांधी म्हणाले होते, अदानी हा एक फुगा असून तो लवकरच फुटेल…मात्र आता या फुटलेल्या फुग्यात हवा मारण्याचं राष्ट्रीय कार्य नव्याने सुरु असल्याचा घणाघात सामनातून करण्यात आलाय.

‘ममतांचं वागणं रहस्य’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांनी एक असावं, अशी अपेक्षा सामनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलंय. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही छळ सुरु आहे. मात्र हिंडेनबर्गने फोडलेल्या फुग्याच्या बाबतीत ते गप्प आहेत. ममता व त्यांच्या पक्षाची लोकसभेत चांगली ताकद आहे. ते या प्रश्नी कुंपणावर बसून का बघत आहेत, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आलाय. ममतांच्या प्रतिमेस व झुंजारपणास हे शोभणारे नाही, असं वक्तव्यही सामनातून करण्यात आलंय.

मन की बात शांत का?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना मौनी बाबा म्हणणारं मोदींचं सरकार प्रथमच संकटाच्या कोंडीत सापडले आहे. बदनाम झाले आहे. जनता हिशेब मागत असताना मोदी यांची मन की बात शांत, अशा वेळी विरोधकांनी शांत बसू नये, असे आवाहन सामनातून करण्यात आले आहे.