“हिंमत असेल तर…”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले “मराठी लोकांमध्ये भांडण…”.

"दोन महिन्यांनी सत्ता आमच्या हातातही येईल. तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात, कोणत्या बिळात लपून बघणार आहात, हे आम्हीही बघतो", असे संजय राऊत म्हणाले.

हिंमत असेल तर..., संजय राऊतांचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले मराठी लोकांमध्ये भांडण....
| Updated on: Aug 12, 2024 | 10:54 AM

Sanjay Raut Challenge to Raj Thackeray : “जर तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाहा अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्या”, असे खुले आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिले. ते प्रसारमाध्यमांशी बोलते होते. यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेला हल्ला, राज ठाकरे, अमित शाह यांच्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार निशाणा साधला.

“कोणत्या बिळात लपून बसणार”

“उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर ठाण्यात जो हल्ला झाला, हे सर्व हल्ले करणारे सुपारी गँगचे कार्यकर्ते होते. या सुपारी गँगचे सर्वेसर्वा अहमद शाह अब्दाली हे दिल्लीत बसले आहेत. ठाण्यात जो हल्ला झाला तो हल्ला करणारे एकनाथ शिंदे यांचे भाडोत्री होते. ते सुपारीबाज होते. त्यांचा पदार्फाश नेहमी होत असतो. यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे सर्व लोक यांचेच होते. यातील कोणीही ठाण्यातील नव्हतं. सर्व बाहेरुन आणलेले लोक होते. तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही हे करताय ना? दोन महिन्यांनी सत्ता आमच्या हातातही येईल. तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात, कोणत्या बिळात लपून बसणार आहात, हे आम्हीही बघतो”, असे संजय राऊत म्हणाले.

“मराठी माणसांमध्ये भांडण लावायची नाहीत”

“अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला हे सर्व सुपारीबाज बळी पडत आहेत. बीडमधील घटनेशी आमचा संबंध नाही, असे आम्ही तुम्हाला सांगितले होते. पण तरीही तुम्ही आम्हाला आव्हाने कसली देताय? आम्ही अधिकृतपणे सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला आणि शिवसेनेला तुम्ही आव्हान देताय? तुम्ही एकमेकांचे समर्थन करताय, चोर चोराचे समर्थन करतात. पण काहीही हरकत नाही. आम्हाला महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये भांडण लावायची नाहीत. जर कोणी लावत असेल, आम्हाला ते मान्य नाही”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

“अहमद शाहा अब्दालीला धमकी द्या”

“तुम्ही आम्हाला धमक्या देताय, बघून घेऊ वैगरे, मग हीच धमकी अहमद शाहा अब्दालीला द्या ना. जो महाराष्ट्राची लूट करतोय, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय, त्याला आवाहन द्या ना. हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाहा अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा. तिकडे शेपट्या घालण्याचे काम करता. आम्हीही हे बघून घेऊ”, असेही संजय राऊत म्हणाले.

“बीडमध्ये हल्ला करणारे ते कार्यकर्ते आमच्या पक्षाचे नव्हते, हे मी आधीच सांगितलं आहे. ज्याच्याशी आमच्या पक्षाचा संबंध नाही, तो मी कधीही मान्य करणार नाही. राज ठाकरेंनी त्यांची काळजी घ्यावी. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना काळजी घ्यायला सांगा. आम्ही ईडीपुढे घाबरलो नाही. आम्ही तुरुंगात गेलो”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.