संजय राऊतांना पुन्हा एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश, ‘या’ तारखेला बेळगाव न्यायालयात जावं लागणार

| Updated on: Dec 01, 2022 | 1:53 PM

संजय राऊतांना पुन्हा एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संजय राऊतांना पुन्हा एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश, या तारखेला बेळगाव न्यायालयात जावं लागणार
संजय राऊत
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 7 फेब्रुवारीला बेळगाव न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. व्यक्तिगत कारणामुळे आज उपस्थित राहू शकत नसल्याचं संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला (Belgaum Court) कळवलं होतं. त्यानंतर पुढची तारीख देण्याची विनंती वकिलांनी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही पुढील तारीख दिली आहे.

30 मार्च 2018 ला बेळगावमध्ये सीमाप्रश्नी केलेल्या भाषणात संजय राऊत यांनी प्रक्षोभक विधाने केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी संजय राऊत यांना आज बेळगाव न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स होते. आता बेळगाव न्यायालयाने त्यांना पुढची तारीख दिली आहे.

30 मार्च 2018 ला संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर काल बोलताना राऊतांनी आपण या सुनावणीला हजर राहणार नसल्याचं म्हटलं. वकिलाला पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार आज राऊतांचे वकील न्यायालयात गेले होते. त्यांना आता पुढची तारीख देण्यात आली आहे.

सध्या बेळगाव-महाराष्ट्र सीमावादावरुन राजकीय वातावरण तापलंय.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगितलाय. त्यामुळे वाातवरण तापलेलं असतानाच राऊतांना बेळगाव न्यायालयाचं समन्स आलं होतं. त्यानंतरही राऊत कर्नाटक सीमाप्रश्नावर आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत.

मला बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि मला अटक करण्याचा डाव असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राऊत या सुनावणीवेळी हजर राहतात का? हे पाहणं महत्वाचं असेल.