2022 मध्ये आम्हीही हंबरडा फोडला होता, तेव्हापासून ते… संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज छत्रपती संभाजी नगरमध्ये हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या हंबरडा मोर्चावर मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

2022 मध्ये आम्हीही हंबरडा फोडला होता, तेव्हापासून ते... संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
sanjay shirsat and uddhav thackeray
| Updated on: Oct 11, 2025 | 5:46 PM

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज छत्रपती संभाजी नगरमध्ये हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले, तसेच सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावा असे आवाहन केले. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या या हंबरडा मोर्चावर मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हंबरडा मोर्चात एकही शेतकरी नव्हता…

उद्धव ठाकरेंवर टीका करताना लातूरमध्ये बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता. मराठवाड्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून त्यांनी मोर्चा काढला. ही वेळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख जाणून घेण्याची आहे, त्यांना मदत करणे हे महत्त्वाचं आहे मोर्चा काढून काय साध्य करायच आहे? मोर्चा काढून शेतकरी रडतोय त्याचे फोटो तुम्हाला छापायचेत. पण आमची प्रामाणिक भूमिका आहे विरोधी पक्ष यांनी देखील सोबत येऊन शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे.

केंद्राकडून आणखी मदत मागवणार – शिरसाट

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, ‘अशा काळात आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष मानत नाही. शेतकऱ्यांवर आलेला संकट प्राधान्याने घेतो. म्हणूनच सरकारने 31 हजार 628 कोटीचे पॅकेज जाहीर केलं. सरकारने जी घोषणा केली ते शेतकऱ्यांना मिळणार आम्ही आजही या मदतीवर समाधानी नाहीत. आम्हाला केंद्राकडून काही मदत शेतकऱ्यांसाठी मागवायची आहे.’

आम्ही देखील 2022 साली हंबरडा फोडला होता – संजय शिरसाट

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढून त्यांची केविलवाणी अवस्था त्यांनी दाखवली. आम्ही देखील 2022 साली हंबरडा फोडला होता, तेव्हापासून हे रडत आहेत. टीका करण्याशिवाय त्यांनी काही केलं नाही. हा हंबरडा शेतकऱ्यांचा नसून ठाकरे गटाचा आहे. पक्ष फुटला त्याचा हंबरडा, आमदार पळून गेले त्याचा हंबरडा, खासदार गेले त्याचा हंबरडा, पदाधिकारी गेले त्याचा हंबरडा, त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही त्यामुळे तो हंबरडा मोर्चा आहे.’