Uddhav Thackeray: सच्चा शिवसैनिक कदापी अविश्वास दाखविणे शक्य नाही, मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार राहिलेल्या सुभाष देसाईचं ट्विट

एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदार सध्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करत प्रथम शिंदेंसह सर्व आमदार सूरतला गेले, मग तेथून गुवाहाटीला गेले. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 34 आणि अपक्ष 8 आमदार आहेत.

Uddhav Thackeray: सच्चा शिवसैनिक कदापी अविश्वास दाखविणे शक्य नाही, मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार राहिलेल्या सुभाष देसाईचं ट्विट
शिवसेना नेते सुभाष देसाई
Image Credit source: Google
| Updated on: Jun 23, 2022 | 5:52 PM

मुंबई : गेले तीन दिवस राज्यात राजकीय नाट्य सुरु आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या नाराजीबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही’, असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. देसाईंनी ट्विट (Tweet) करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये सुभाष देसाई यांचे दुसरे नाव होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचाही शिंदेंना पाठिंबा

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी देखील एकनाथ शिंदे पाठिंबा दर्शवला आहे. नरेश म्हस्के यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकत शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. ‘साहेब आम्ही तुमच्यासोबत आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळाना!’ अशी पोस्ट ट्विटरवर टाकतनरेश म्हस्के यांनी शिंदे यांना आपल्यासोबत असल्याचे आश्वस्त केले आहे.

मुख्यमंत्री वर्षा बंगला सोडून मातोश्रीत परतले

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना आवाहन केले आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री पद हवे असल्यास आपण खुर्ची सोडण्यास तयार आहोत. फक्त समोर येऊन एकदा सांगा, मी तात्काळ राजीनामा देईन, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानंतर रात्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आणि ते आपल्या मूळ निवासस्थानी मातोश्री येथे दाखल झाले.

किशोरा पेडणेकर यांचे भावनिक आवाहन

महापौर किशोरी पेडणेकर यांनीही काल शिंदे यांना ‘परत या’ असे भावनिक आवाहन केले होते. यावेळी किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदार सध्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करत प्रथम शिंदेंसह सर्व आमदार सूरतला गेले, मग तेथून गुवाहाटीला गेले. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 34 आणि अपक्ष 8 आमदार आहेत. (Senior Shiv Sena leader Subhash Desais reaction to Eknath Shindes revolt)