
शरद पवारांनी लोकसभेतला महाविकास आघाडीचा आकडाच सांगितला. आम्हाला 30-35 जागा मिळणार, असा दावा शरद पवारांनी केलाय. म्हणजेच शरद पवारांच्या दाव्याप्रमाणं भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला 13-18 जागा मिळतील. तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्याच राष्ट्रवादीला 30-35 जागा मिळतील अशी आशा शरद पवारांना आहे. 30-35 जागांचा दावा करुन, पवारांनी भाजपच्या गोटात चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2019च्या लोकसभेचा विचार केला तर, भाजपचे 23 खासदार जिंकले होते. युतीत शिवसेनेचे 18 जागा निवडून आले होते. काँग्रेसला 1 जागा, राष्ट्रवादीचे 4 खासदार जिंकले, एमआयएमचा 1 खासदार आणि अमरावतीतून नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या होत्या. अर्थात अमरावतीत त्यांना राष्ट्रवादीचा पाठींबा होता.
अद्याप महाराष्ट्रात लोकसभेचे 3 टप्पे झाले आहेत. आणखी 2 टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने? याचा फैसला 4 जूनलाच होईल. पण 30-35 चा आकडा सांगताना, पवारांनी मोदींच्या प्रचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलंय. पहिल्या 2 टप्प्याच्या मतदानानंतर मोदी अस्वस्थ झाल्यानंच मुस्लीम विरोधी प्रचार करत असल्याचा आरोप पवारांनी केलाय.
काँग्रेस किंवा इंडिया आघाडी सत्तेत आल्यास, ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना दिलं जाईल. तसंच सोनं, मंगळसूत्रही मुस्लिमांना वाटून दिलं जाईल, अशी टीका मोदी प्रचार सभेतून करत आहेत. आता ज्या मुस्लीम आरक्षणावरुन वार पलटवार सुरु झालाय. त्या आरक्षणाची स्थितीही पाहुयात.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार मुस्लीम आरक्षणाच्या बाजूनं झुकलाय. पंतप्रधान मोदी, आक्रमकतेनं मुस्लिम आरक्षणावरुन इंडिया आघाडीवर तुटून पडत आहेत. तर आंध्र प्रदेशात भाजपचाच मित्र पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मुस्लीम आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतलीय. आंध्रात मुस्लिमांना मिळत असलेल्या 4 टक्के आरक्षणाचं संरक्षण करणार, असं चंद्राबाबू म्हणाले आहेत. आंध्र प्रदेशात 23 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये मुस्लिम फॅक्टर फार महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपची भूमिका वेगळी असली तरी, चंद्राबाबू मुस्लीम आरक्षणावर ठाम आहेत.