
माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसले आहेत. काहीही झालं तरी मी अन्नाचा एकही कण घेणार नाही, असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली ते जाणून घेऊयात.
दोघांमध्ये काय बोलणं झालं?
शरद पवार यांनी आज आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनाबाबत माहिती विचारली. यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की, “कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते, तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करुन देऊ अशी माहिती दिली आहे. मात्र मी मीटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. आम्हाला भेट नको, निर्णय हवा आहे.” यानंतर बच्चू कडू यांनी तुमच्याकडून उद्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी आलं तर बरं होईल असं म्हटलं.
मनोज जरांगे यांचा बच्चू कडू यांना पाठिंबा
बच्चू कडू यांची प्रमुख मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आहे. त्यांच्या याच मागणीला मनोज जरांगे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उद्या (11 जून) दुपारी 4 वाजता मनोज जरांगे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बच्चू कडू यांचे दोन किलो वजन घटले
बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या आंदोलनामुळे त्यांचे वजन दोन किलोंनी घटले आहे. तसेच बच्चू कडू यांचा बीपीही लो झाला आहे. त्यांनी तत्काळ औषधं घ्यावीत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र कडू यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे.